Coronavirus In Mumbai: मुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणार तर मद्य विक्री बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:22 IST2020-05-06T03:41:29+5:302020-05-06T07:22:32+5:30
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठा आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडल्यास लॉकडाउनमुळे आतापर्यंत थोपवलेल्या या आजाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

Coronavirus In Mumbai: मुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणार तर मद्य विक्री बंद
मुंबई : लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला तरी राज्य शासनाने काही नियम शिथिल केले. विशेषत: मद्यविक्री करणारी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी रविवारपासून दिली होती. मात्र सोमवारी मुंबईतील सर्वच विभागांमध्ये मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवर लोकांची झुंबड उडाली. यामुळे सोशल डिस्टन्सिंग नियमाची पायमल्ली होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यापुढे मुंबईत केवळ किराणा माल आणि औषध विक्रीची दुकाने सुरू राहतील, असे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे मद्यविक्री आणि कोरोनाचा प्रभाव नसलेल्या विभागातील पाच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगीही रद्द झाली आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा नऊ हजारांहून अधिक आहे. या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. तिसºया टप्प्यात लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र या नियमात शिथिलता आणत घाऊक व किरकोळ मद्य विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठा आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडल्यास लॉकडाउनमुळे आतापर्यंत थोपवलेल्या या आजाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे केवळ किरणा माल आणि औषध विक्रीची दुकाने सुरू राहतील, याची खबरदारी घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी सर्व २४ विभागांचे सहायक आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
‘लोक शिस्त पाळत नाहीत’
दुकान सुरू ठेवल्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढल्याने इतक्या दिवसांपासून घेतलेली मेहनत वाया जाण्याची भीती आयुक्तांना वाटत आहे. लोक शिस्त पाळत नसून एका ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, अशी तक्रार पोलीस आणि विभाग कार्यालयातील अधिकाºयांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.