Coronavirus: दुर्दम्य इच्छाशक्तीने झपाटलेले 'ते' ७५५ कर्मचारी अधिकारी सतत कामात व्यस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:50 AM2020-05-13T10:50:34+5:302020-05-13T10:51:44+5:30

Lockdown News: सगळा देश लॉकडाऊनमध्ये बंद आहे. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोसळलेला आहे. तरीही राज्यातील एमटीडीसीचे १६३ कायमस्वरुपी आणि ५९२ कंत्राटी कामगार पूर्णवेळ कामावर आहेत.

Coronavirus: State MTDC Tourism Sector Employee work regularly during lockdown in resort | Coronavirus: दुर्दम्य इच्छाशक्तीने झपाटलेले 'ते' ७५५ कर्मचारी अधिकारी सतत कामात व्यस्त!

Coronavirus: दुर्दम्य इच्छाशक्तीने झपाटलेले 'ते' ७५५ कर्मचारी अधिकारी सतत कामात व्यस्त!

Next

अतुल कुलकर्णी

मुंबई : गावात दुष्काळ पडलेला असतो. सगळे गावकरी ठरवतात की माळरानावर जायचे, आणि प्रार्थना करायची. सगळे जमतात. एक मुलगा मात्र येताना छत्री घेऊन येतो. सगळे त्याला म्हणतात, गावात दुष्काळ असताना आपण पाऊस पडावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी आलोय, तू छत्री कशासाठी आणलीस? त्यावर मुलगा म्हणतो, प्रार्थनेनंतर पाऊस आला की लागेल ना छत्री..! या कथेतल्या मुलाच्या मनात जो टोकाचा विश्वास आहे तोच विश्वास आणि प्रचंड आशावाद मनात घेऊन एमटीडीसीचे राज्यातील ७५५ कर्मचारी ३३ रिसोर्टची रोज नित्यनेमाने देखभाल करत आहेत.

सगळा देश लॉकडाऊनमध्ये बंद आहे. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोसळलेला आहे. तरीही राज्यातील एमटीडीसीचे १६३ कायमस्वरुपी आणि ५९२ कंत्राटी कामगार पूर्णवेळ कामावर आहेत. गणपतीपुळ्यापासून ते ताडोबा, महाबळेश्वर, बोधलकसा, पानशेत, कार्ला, माळशेजघाट, माथेरान, तारकर्ली, फर्दापूर, औरंगाबाद, अजंठा, शिर्डी, चिखलदरा, भीमाशंकर अशा विविध २३ ठिकाणच्या रिसॉर्टमधील ९१२ खोल्या आणि १० ठिकाणच्या २२ डॉरमेटरीजची देखभाल, साफसफाई, दुरुस्तीमध्ये हे सगळे व्यस्त आहेत. एमटीडीसीचे एमडी अभिमन्यू काळे यांनी व्हॉटसअपवर ‘एमटीडीसी ऑफीसर्स नेटवर्क’ असा ग्रूप तयार केला आणि रोज तुम्ही जे काही काम करता त्याचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करण्याचे बंधन घातले आणि  पहाता पहाता राज्यातील सगळे रिसॉर्ट चकाचक दिसणे सुरु झाले.

कोणी किचनची सफाई करत आहे, तर कोणी लाईट, एसी, फॅन तपासत आहे, कोणी झाडांना पाणी घालत आहे, कोणी मान्सून पूर्व कामं म्हणून झाडांची कटाई करत आहे तर कोणी रेलिंगची साफसफाई करत आहे, कुठे बेडशिट, कुठे गाद्यांची दुरुस्ती चालू आहे. ही सगळी कामं आपण स्वत: व्हॉटसअपवर रोज मॉनीटर करत आहोत असेही काळे म्हणाले. हे करण्यामागे उद्देश काय होता असे विचारले असता काळे म्हणाले, किती दिवस लॉकडाऊन राहील माहिती नाही. एवढे दिवस जर आम्ही सगळे बंद करुन ठेवले असते आणि कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले असते तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या कृतीच्या विरुध्द झाले असते.

शिवाय जेव्हा सगळी परिस्थिती नॉर्मल होईल तेव्हा आम्हाला बुकींग मिळाल्यास नव्याने साफसफाई करणे सुरु केल्यास त्यावर खर्च, वेळ वाया गेला असता. त्यामुळे कोणत्याही कंत्राटी कामगाराला कामावरुन कमी न करता आमचे सगळे रिसॉर्ट पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.  फक्त तेथे पर्यटक नाहीत. ज्या दिवशी सगळे नॉर्मल होईल अगदी त्याच दिवशी आम्ही पर्यटकांचे आनंदाने स्वागत करु एवढे सगळे रिसॉर्ट ‘अपटूडेट’ आहेत असेही काळे म्हणाले.

२०१८-१९ मध्ये एमटीडीसीने २३ कोटी ९३ लाख ८४ हजार रुपये पर्यटनातून मिळवले. त्यातून व्यवस्थापन खर्च आणि पगारावरील खर्च वजा जाता १० कोटी ७२ लाख ४३ हजार रुपये सरकारला मिळवून दिले आहेत. एमटीडीसीच्या १५ ठिकाणाहून हॉटेलही चालवले जाते. सगळ्या जगाचा पर्यटन व्यवसाय ठप्प झालेला असताना त्यातल्या काहींनी या अशा काळातही ऑनलाईन खाण्याच्या ऑर्डर घेणे सुरु केले आहे. एमटीडीसी नागपूरने पनीर दम बिर्याणी पासून अनेक चांगले चांगले पदार्थ ऑनलाईन फूड व्यवसाय सुरु ठेवून सरकारच्या तिजोरीत पैसेही जमा करणे सुरु केले आहे.

Web Title: Coronavirus: State MTDC Tourism Sector Employee work regularly during lockdown in resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.