Join us  

coronavirus: कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी, राज्यपालांची भेट घेत भाजपाच्या शिष्टमंडळाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:15 PM

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राजभवन येथे जात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली.

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची चौथ्या टप्प्यातील अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्यावर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात  अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राजभवन येथे जात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात  अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला.   दरम्यान, कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपामहाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपा  प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.  महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदन देणार आहेत.तर शुक्रवारी लाखो कार्यकर्ते आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही हातावर पोट असलेल्यांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे ही पक्षाची प्रमुख मागणी आहे, असे भाजपाच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसदेवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र