CoronaVirus: नायर रुग्णालयातील परिचारिका, कर्मचाऱ्यांचे अलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 09:59 PM2020-03-30T21:59:50+5:302020-03-30T22:00:33+5:30

नायरमध्ये ६० वर्षीय कोरोना रुग्ण, मात्र अपुऱ्या सुरक्षेचा कर्मचाऱ्यांना फटका

CoronaVirus Separation of nurse-staff at Nair Hospital | CoronaVirus: नायर रुग्णालयातील परिचारिका, कर्मचाऱ्यांचे अलगीकरण

CoronaVirus: नायर रुग्णालयातील परिचारिका, कर्मचाऱ्यांचे अलगीकरण

Next

मुंबई -  मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात रविवारी एक रुग्ण दाखल झाला.  त्याच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल सोमवारी पाॅझिटिव्ह असल्याचा निर्वाळा पालिकेच्या आरोग्य विभागाने दिला. दरम्यान, रविवारी रुग्ण दाखल झाला त्यावेळेस केवळ एकच पीपीई कीट उपलब्ध असल्याने ते कर्तव्यावरील डॉक्टरला देण्यात आले. अन्य परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा कीट उपलब्ध नसल्याने त्यांनी त्या रुग्णास सेवा दिली. मात्र हा रुग्ण सोमवारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने रुग्णालय प्रशासनाने ‘त्या‘ सर्व परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरगुती अलगीकऱणाचा सल्ला दिला आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून फ्रंटलाइनवर असणाऱ्या सर्व स्तरांतील डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन सातत्याने या सर्वांना सुरक्षा कवच देण्याच्या प्रयत्नात असले तरीही अजूनही पीपीई कीट, मास्क, हँडग्लोव्हज यांचा प्रचंड तुटवडा भासत आहे. परिणामी, याचा फटका नायर रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.


याविषयी, चौदा दिवसांचे घरगुती अलगीकरण सांगितलेल्या नायर रुग्णालयाच्या परिचारिकेने सांगितले, कोरोना कक्षात रविवारी एका स्थानिक लोकप्रतिनिधीच्या ओळखीने रुग्ण दाखल झाला. त्यावेळेस त्याला उपचार देण्यास सर्वांची धावाधाव झाली, दरम्यान एकच पीपीई असल्याने ते डॉक्टरांनी वापरले. अन्य कर्मचारी व परिचारिकांना एचआयव्ही किट वापरण्यास सांगितले, मात्र रुग्णालयात त्याचाही तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही त्याही स्थितीत रुग्णसेवा दिली. मात्र, सोमवारी सकाळी अचानक रुग्णालय प्रशासनाने जवळपास १२ परिचारिका- वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरगुती अलगीकऱणास (होम क्वारंटाइन) सांगितले आहे. हा निर्णय अचानक झाल्यामुळे सर्व जण घाबरले आहेत, मात्र गंभीर स्थिती प्रशासनाने ओळखावी आणि सर्वांना सुरक्षा द्यावी ही मागणी आहे. याविषयी, नायर रुग्णालयाच्या अधिष्ठांताशी संपर्क कऱण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: CoronaVirus Separation of nurse-staff at Nair Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.