CoronaVirus : 'कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 01:42 PM2020-04-01T13:42:06+5:302020-04-01T14:36:32+5:30

coronavirus : ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे.

CoronaVirus: Rajesh Tope appreciate to Doctors for serving corona patients rkp | CoronaVirus : 'कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक'

CoronaVirus : 'कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक'

Next

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी युद्धातील आघाडीवरचे सैनिक अशी उपमा दिली असून जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शौर्य दाखविताना न थकता हे काम सुरू असल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी यासर्वांना मानाचा मुजरा करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. 

आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून आरोग्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला आणि तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करताय. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार!

कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यापासून आपण सर्वप्रथम त्याला सामोरे गेला आहात. सर्वात आधी तुम्ही मंडळींनी या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केलं. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढता आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय आहे.

तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच परंतु आम्हालाही त्यामुळे काम करण्याचं पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. समस्त देशवासिय आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. 

पुन्हा मी आपणा सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करतो, कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असे आवाहनही शेवटी आरोग्यमंत्र्यांनी या पत्रात केलं आहे.

 

Web Title: CoronaVirus: Rajesh Tope appreciate to Doctors for serving corona patients rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.