CoronaVirus: याला काय म्हणावं? माणसं घरी; दगड, कापड, पिशव्या रांगेत; माटुंग्यातील अजब प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 12:21 IST2020-04-09T11:42:30+5:302020-04-09T12:21:16+5:30
coronavirus सकाळी दगड रांगेत ठेवून ग्राहक घरी

CoronaVirus: याला काय म्हणावं? माणसं घरी; दगड, कापड, पिशव्या रांगेत; माटुंग्यातील अजब प्रकार
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं जात असताना मुंबईच्या माटुंग्यात अजब प्रकार पाहायला मिळाला. मांटुगा पूर्वेतील सहकारी भंडारसमोर रांग लावण्यासाठी आखण्यात आलेल्या चौकटींमध्ये दगड, रुमाल अशा वस्तू ठेवून दिल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल दुकानाच्या व्यवस्थापकांकडे चौकशी केली असता, दुकान सुरू होताच केवळ रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा प्रकारे दगड ठेवून रांगा लावणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माटुंगा पूर्वेला असलेलं सहकारी भंडार सकाळी १० वाजता उघडतं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दुकानाच्या शेजारी असलेल्या पदपथावर चौकोन आखण्यात आलं आहे. सामान खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांनी याच चौकोनात उभं राहणं अपेक्षित आहे. मात्र शेजारी राहणारे काही जण सकाळी लवकर येऊन चौकटींमध्ये दगड, रुमाल अशा वस्तू ठेवून जातात. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
याबद्दल सहकारी भंडारच्या व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता, त्यांनी दुकान उघडल्यावर केवळ रांगेत उपस्थित असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल, असं सांगितलं. रांगेत दगड ठेवून गेलेल्या व्यक्तींना दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांना रांगेत उभं राहण्यास सांगितलं जाईल, असं आश्वासन व्यवस्थापकांनी दिलं.