Coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही आढळला रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 22:20 IST2020-03-12T22:11:18+5:302020-03-12T22:20:14+5:30
Coronavirus : मुंबईतील रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, मुंबईपाठोपाठ ठाण्यातही आढळला रुग्ण
मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 14वर पोहोचला आहे. गुरुवारी ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. ठाण्यातील रुग्ण फ्रान्सवरून तर मुंबईतील रुग्ण दुबईहून आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, मुंबईतील रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. लोकांमध्ये जागरुकता करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारकडून अत्यंत प्रभावीपणे त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जाहिरातींद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
याचबरोबर, लोकांची गर्दी टाळणे, संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. खबरदारी म्हणून शासकीय कार्यक्रम महाराष्ट्रात होणार नाहीत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच, स्वीमिंग पूल जावे की नको, तपकीर ओढून कोरोना जातो का किंवा गावोगावी स्थानिक उपचारांबाबत विचारले जाते. मात्र ते अत्यंत चुकीचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, पुण्यात आज संध्याकाळी आणखी एक करोनाचा रुग्ण आढळला आहे. अमेरिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 9 वर पोहोचली आहे. तर मुंबईत तीन, ठाण्यात आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने राज्यातील आकडा 14 वर पोहोचला आहे.
चीनमधील कोरोनामुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.