coronavirus : हे योग्य नाही... शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिडले रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 11:49 IST2020-04-01T09:28:13+5:302020-04-01T11:49:51+5:30
लॉकडाऊनसारख्या आणिबाणीच्या काळातही अनेकजण स्वार्थ साधून स्वत:चे हित पाहत आहेत. समाजाशी आपलं काहीही देणं-घेण नाही, अशाच अविर्भावात हे लोक वागत आहेत

coronavirus : हे योग्य नाही... शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चिडले रोहित पवार
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्वसामान्य नागरिक दैनंदिन व जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी धडपड करत आहे. विशेष म्हणजे या वस्तू किराणा दुकान, मॉल आणि भाजीमार्केटमधून त्यांच्यापर्यंत पोहोचतही आहेत. मात्र, याचा फायदा धान्य पिकवणाऱ्या, दुध विकणाऱ्या किंवा शेळीपालन-पोल्ट्रीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाही. दलाल व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येतेय. तर, ग्राहकांची लूट होतेय. याबाबत कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.
लॉकडाऊनसारख्या आणिबाणीच्या काळातही अनेकजण स्वार्थ साधून स्वत:चे हित पाहत आहेत. समाजाशी आपलं काहीही देणं-घेण नाही, अशाच अविर्भावात हे लोक वागत आहेत. त्यामुळेच, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव पडले असून चिकनचेही भाव गडगडले आहेत. मात्र, ग्राहकांना या कमी भावात हे पदार्थ मिळत नाहीत. ग्राहकांना सध्याच्या दरांपेक्षा अधिक भाव देऊन हे पदार्थ घ्यावे लागत आहेत. याचाच अर्थ, व्यापारी किंवा यामधील साखळी असलेले दलाल या संवेदनशील परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांनी काळजी व्यक्त करत, हे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
शहरात चिकन व भाजीपाला महाग घ्यावा लागत असला तरी हे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शेतकऱ्यांना अधिकचे पैसे व ग्राहकांनाही योग्य भावात माल मिळाला पाहिजे. पण शेतकऱ्यांना १०-२० रुपयाला कोंबडी विकावी लागतेय अन ग्राहकांना दिडशे रु. भावाने चिकन घ्यावं लागतंय. भाजीचंही तसंच. हे योग्य नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 31, 2020
आपल्या ट्विटर अकाऊटवरुन रोहित पवार यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांची व्यथा मांडलीय. तसेच, अप्रत्यक्षपणे साठेबाजी आणि जादा दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुनावले आहे. शेतकऱ्यांना १० ते २० रुपयात कोंबडी विकावी लागतेय, हे योग्य नाही असे पवार यांनी म्हटलंय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊ घोषित केलं आहे. मात्र, या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य गरिब, शेतकरी आणि मजूर वर्गाला बसताना दिसून येतोय.