Coronavirus News: राज्यात दिवसभरात पाच लाख जणांचे लसीकरण; आतापर्यंतची विक्रमी नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 06:45 IST2021-04-27T05:35:26+5:302021-04-27T06:45:03+5:30
आतापर्यंतची विक्रमी नोंद, आज दीड कोटीचा टप्पा ओलांडणार

Coronavirus News: राज्यात दिवसभरात पाच लाख जणांचे लसीकरण; आतापर्यंतची विक्रमी नोंद
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून, सोमवारी सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. मंगळवारी लसीकरणाच्या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकते. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.
लसीकरणात महाराष्ट्र देशात सतत अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होते. उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
दिवसाला ८ लाखाचे उद्दिष्ट : राजेश टोपे
सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री