Join us  

CoronaVirus News: रुग्णसंख्या वाढली तरी घाबरण्याचे कारण नाही; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:34 PM

कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही

मुंबई : राज्यातील जनतेने लॉकडाऊनच्या काळात केलेल्या सहकार्यामुळे आपण कोरोना विषाणूचा संभाव्य उद्रेक रोखू शकलो. पण कोरोनाविरोधातील लढाई अजून संपलेली नाही. कदाचित पुढची लढाई आणखी गंभीर असेल. रुग्णांची संख्याही वाढेल, पण घाबरून जाऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी रविवारी संवाद साधला. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत.

देशातील पहिले फिल्ड हॉस्पिटल वांद्रे कुर्ला संकुलात उभे केले. तसेच ऑक्सिजनसह आयसीयू बेडस असलेल्या रुग्णालयांची मुंबईसह महाराष्ट्रात उभारणी होत असून काही लाखांत बेडस् निर्माण केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मे अखेरीस एकट्या मुंबईत मे अखेरीस १४ हजार बेडस्, आॅक्सिजन आणि आयसीयूच्या सुविधांसह उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय पथकाच्या अंदाजापेक्षा राज्यातील आकडा बराच कमी

केंद्राकडून तपासणीसाठी आलेल्या पथकाने मे अखेरीस राज्यात सव्वा ते दीड लाखापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण होतील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र लॉकडाउनमुळे हा आकडा ३३ हजारापर्यंत रोखून ठेवण्यात आपल्याला यश आले आहे. सध्या रुग्णांचा आकडा ४७,७८६ असला तरी त्यात बरे झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा ते ३३ हजार आहे. १५४६ मृत्यू झाले ही दुर्दैवी बाब असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

...तर सगळे बंद करावे लागेल

३१ मे नंतर लॉकडाऊनचे काय होणार ते कालांतराने कळेल. लॉकडाउनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. मात्र लॉकडाउन एकदम उठवणेही चुकीचे आहे. हळूहळू सगळे सुरु करतो आहोत. मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळे बंद करावं लागणार, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. दुकाने, व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू होतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेमहाराष्ट्र