CoronaVirus News: मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 02:26 IST2021-04-04T02:26:14+5:302021-04-04T02:26:45+5:30
प्रत्येक इमारतीमध्ये तसेच सोसायट्यांमधील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

CoronaVirus News: मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असताना यामध्ये ९० टक्के रुग्ण इमारतींमधील आहेत. पाचपेक्षा जास्त बाधित रुग्ण सापडल्याने आतापर्यंत ६८१ इमारती तर आठ हजार ७९० इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये तसेच सोसायट्यांमधील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
अशा आहेत सूचना...
सोसायटीमध्ये वावरताना प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. या नियमाचेे पालन होत असल्याची खातरजमा सोसायटीतील सर्वांनी करावी.
घराबाहेर पडताना प्रत्येकाने सॅनिटायझर, मास्क व हातमोजांचा वापर करून बाहेर पडावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
सोसायटी - वसाहतीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा. प्रतीक्षागृहाचा शक्यतो उपयोग करू नये. ते बंदच ठेवावे.
सोसायटीत दरवाजाची कडी, कठडे, लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे.
सोसायटीतील लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी तुकड्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कचऱ्याच्या डब्यात टाकावेत.
सोसायटीतून पुन्हा घरात येताच कुठेही स्पर्श न करता सर्वांत आधी साबणाने हात धुवावेत. सोसायटीमध्ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये.
बाहेरून येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्वच्छ धुण्याची सोय आदी बाबी उपलब्ध असल्याची खातरजमा करावी.
ऑनलाइन पार्सल
मागविल्यानंतर, ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे अशा एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करून ते घरात न्यावे. शक्य असल्यास काही तास ते पार्सल खुल्या जागेत राहू द्यावे आणि नंतर घरात न्यावे.
वाहनांना स्पर्श करण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. स्थानिक महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष असे महत्त्वाचे संपर्क क्रमांक ठळकपणे दिसतील अशा रीतीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावेत.