CoronaVirus News: मुंबई सावरतेय! रुग्ण दुपटीचा दर ५७ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 06:30 IST2020-07-21T00:27:34+5:302020-07-21T06:30:02+5:30
मुंबईत सध्या २३,७२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत सोमवारी १०३५ रुग्णांची तर ४१ मृत्यूंची नोंद झाली.

CoronaVirus News: मुंबई सावरतेय! रुग्ण दुपटीचा दर ५७ दिवसांवर
मुंबई : कोरोनाविरोधात चार महिने प्रदीर्घ लढा दिल्यानंतर आता मुंबई सावरत असल्याची सकारात्मक बाब समोर येत आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर तब्बल ५७ दिवसांवर पोहोचला असून बरे झालेल्या रुग्णांचा दर ७१ टक्के आहे. याशिवाय, आतापर्यंत ७२,६४८ रुग्ण कोविडमुक्त झाले.
मुंबईत सध्या २३,७२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत सोमवारी १०३५ रुग्णांची तर ४१ मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची संख्या १,२४,०२३ वर पोहोचली असून एकूण मृत्यू ५,७५५ एवढे झाले आहेत. अन्य कारणांमुळे २९२ रुग्णांचे मृत्यू झाले.
१९ विभागांना दिलासा
दिलासादायक बाब म्हणजे शहर-उपनगरांतील २४ पैकी १९ विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर दीड टक्क्यांहून कमी आहे. उर्वरित विभागांत संक्रमणाचे प्रमाण कमी होत आहे. शहर-उपनगरात रुग्णवाढीचा दरही १.२१ टक्क्यांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर नऊ प्रभागांत एक टक्क्याहून कमी असून चार विभागांतील दर १.२ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
आर मध्य बोरीवलीत वाढीचा दर सर्वाधिक २.४ टक्के आहे. त्यानंतर आर उत्तर कांदिवलीत १.८, मलबार हिल १.७, मुलुंड १.७, दहिसर १.६, कुलाबा १.४ टक्के आहे. ए विभागातील संसर्ग मागील तीन दिवसांत वाढत आहे. आर मध्य २.५ टक्के, डी विभागात ग्रँट रोड येथे १.९, आर दक्षिणमध्ये १.९, आर उत्तर येथे १.७ टक्के एवढा रुग्णवाढीचा दर १८ जुलै रोजी नोंदविण्यात आला होता.