CoronaVirus News in Mumbai: रस्ते, पुलांचे काम पूर्ण करण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 01:01 IST2020-05-01T01:00:44+5:302020-05-01T01:01:04+5:30
तसेच धोकादायक ठरलेले पूल पावसाळ्यापूर्वी सुरक्षित करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. यामध्ये ४०५ रस्ते आणि २९ पुलांच्या कामांचा समावेश आहे.

CoronaVirus News in Mumbai: रस्ते, पुलांचे काम पूर्ण करण्याचे आव्हान
मुंबई : कोरोना संसर्गामुळे मुंबईत सुरु असलेल्या लॉकडाउनचा मोठा फटका महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांना बसला आहे. यापैकी अत्यावश्यक काम असलेल्या नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. तसेच धोकादायक ठरलेले पूल पावसाळ्यापूर्वी सुरक्षित करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. यामध्ये ४०५ रस्ते आणि २९ पुलांच्या कामांचा समावेश आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई, रस्त्यांची डागडुजी अशी महत्त्वाची कामे केली जातात. ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची मुदत ठेकेदारांना देण्यात येते. मात्र यावर्षी मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू असल्याने मुंबईत लॉकडाउन सुरू आहे. याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. पावसाळापूर्व कामांना विलंब झाल्यास पावसाळ्यात मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागत असतो. यामुळे २० एप्रिलपासून सूट मिळताच यांत्रिक पद्धतीने नाल्यांची सफाई पालिकेने सुरू केली आहे. मात्र रस्तेदुरुस्ती आणि अतिधोकादायक पुलांची पुनर्बांधणी लांबणीवर पडली आहे.
स्थलांतरित मजुरांची फौज या कामांमध्ये वापरण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास मुंबईकरांची वाट ऐन पावसाळ्यात बिकट होणार आहे. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले
आहे. परंतु, २९ अतिधोकादायक पुलांची पुनर्बांधणी जिकिरीची ठरणार आहे.
रस्त्यांच्या कामांमध्ये शहरात १३२, पूर्व उपनगरात ९५ आणि पश्चिम उपनगरात १७८ कामे सुरू आहेत. तर पुलांच्या कामांमध्ये शहरात १२, पूर्व उपनगरात ११ आणि पश्चिम उपनगरात सहा पुलांची कामे सुरू आहे.
पालिकेकडून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी १५९१, तर पुलांच्या कामांसाठी ६३० कर्मचारी मिळून २२२१ कामगार अहोरात्र काम करीत आहेत.
पालिका अधिकाऱ्यांकडून या कामांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. काम करताना सोशल डिस्टन्सचा नियम पाळून आणि जास्तीत जास्त यांत्रिकी पद्धतीने काम सुरू आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक काळजी घेत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.