CoronaVirus News: More than 5,000 children under the age of 10 are infected with corona in the state | CoronaVirus News: राज्यात १० वर्षांखालील पाच हजारांहून अधिक बालकांना कोरोनाची लागण

CoronaVirus News: राज्यात १० वर्षांखालील पाच हजारांहून अधिक बालकांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाख ४२ हजारांचा टप्पा गाठला आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे. तर नवजात बालक ते १० वर्षे वयोगटातील तब्बल ५ हजार १०३ बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ३.५८ टक्के आहे.
२४ मे रोजी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ४७,०२१ इतका होता. त्यात १० वर्षे वयोगटाच्या आतील १,६८६ मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली. एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३.५८ टक्के होते. त्यानंतर एक महिन्यानंतर रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली. सरकारकडून २५ जून रोजी प्राप्त आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या १,३८,७६५ इतकी झाली. त्यात १० वर्षे वयोगटाच्या आतील ५ हजार १०३ मुले पॉझिटिव्ह आहेत. गेल्या महिन्याभरात लहान मुलांना बाधा होण्याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे.
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२.४२ टक्के एवढा असून उपचार सुरू असलेल्या एकूण सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६९ टक्के आहे.
>९ ते २० वयोगटातील ९,३७१ जणांना संसर्ग
राज्यात एकूण रुग्णसंख्येपैकी ९ ते २० वयोगटांतील ९ हजार ३७१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या रुग्णसंख्येचे प्रमाण ६.५७ एवढे आहे. तर गेल्या महिन्यात हे प्रमाण ६.९५ टक्के इतके होते. त्या वेळी रुग्णसंख्या ३ हजार २६६ एवढी होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: More than 5,000 children under the age of 10 are infected with corona in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.