Join us  

CoronaVirus News: राज्यात चाचण्या वाढवा, संपर्क शोधा; मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 1:14 AM

सह्याद्री अतिथीगृहात पार पडली मंत्रिमंडळ बैठक

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने कोरोना चाचण्या वाढवा, प्रत्येक बाधितामागील संपर्क शोधा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळ बैठकीत एरवी विविध निर्णय होतात.

आजच्या बैठकीत मात्र केवळ आरोग्य विभागाचे सादरीकरण झाले. तसेच, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीच्या अनुषंगाने चाचपणी करण्यात आली. अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मसुद्यावर चर्चा होऊन त्याला मान्यता देण्यात आल्याचे समजते. अधिवेशनाचा कालावधी कमी केले जाणार आहे किंवा पुढे ढकलण्यात येणार असल्याबाबतच्या चर्चा आहेत. 

यासंदर्भात विचारले असता मंत्री नवाब मलिक म्हणाले की, अधिवेशन कालावधी, कामकाजाबाबतचे  निर्णय कामकाज सल्लागार समितीत होतात. गुरूवारी समितीची बैठक  असून यात अभिभाषण, पुरवणी मागण्या, कामकाजाचे दिवस, अर्थसंकल्पासंबंधी चर्चा होईल आणि तिथेच निर्णय घेतला जाईल. तर, कोरोनाचा प्रभाव वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात.

मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे याविषयी नागरिकांत जनजागृती करावी, ‘मी जबाबदार’ मोहिमेची अंमलबजावणी, तसेच सर्वांना लसीकरण याबाबत बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यासंदर्भात मलिक म्हणाले की, सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना कोरोना चाचणी वाढविण्यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने लसीकरणाचा पुढचा टप्पा जाहीर केला  आहे.

राज्यातही लसीकरणाचे  काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे.  साठ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार असून त्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. परंतु,  पैसे घेऊन लस घेण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे. मात्र, अद्यापही अनेकांना पैसे मोजणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांना परवडत नाही अशा लोकांना मोफत लस दिली जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर करावे, अशी मागणी मलिक यांनी यावेळी केली.

संजय राठोड यांची उपस्थिती

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून उठलेल्या वादंगानंतर आज प्रथमच वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. मात्र, वादंगाबाबत बैठकीत कसलीच चर्चा झाली नसल्याचे समजते.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकार