CoronaVirus News: मलबार हिल, पेडर रोड येथील रुग्णसंख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 03:20 IST2020-07-19T03:20:16+5:302020-07-19T03:20:26+5:30
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ५४ दिवसांवर पोहोचला आहे.

CoronaVirus News: मलबार हिल, पेडर रोड येथील रुग्णसंख्येत वाढ
मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत नियंत्रणात येत आहे. मात्र त्याच वेळी उच्चभ्रू वस्ती असलेल्या डी विभागातील मलबार हिल, पेडर रोड, ब्रीच कँडी, कंबाला हिल, गिरगाव या भागांमध्ये रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर सरासरी १.३० टक्के असताना डी विभागात मात्र हे प्रमाण शनिवारी दोन टक्के होते. तसेच येथील रुग्णसंख्या ३५ दिवसांमध्ये दुप्पट होत आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ५४ दिवसांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ७० टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता केवळ बोरीवली, मुलुंड, मलबार हिल, कांदिवली, दहिसर, मालाड अशा काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर मुंबईतील सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अशा विभागांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले असून तत्काळ उपचार सुरू आहेत.
डी विभागांमध्ये आतापर्यंत ३५३० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २५६६ रुग्ण बरे झाले असून सक्रिय रुग्णांची संख्या ८३१ आहे.
मात्र गेल्या काही दिवसांमध्ये डी भागातील उच्चभ्रू वस्तीमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. याबाबत डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांना विचारले असता, ही वाढ दिसत असली तरी यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत. तसेच येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये तपासणीचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. येथील इमारतींमध्ये काम करणाऱ्या नोकरवर्गांमध्ये पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण अधिक आहे.