CoronaVirus News : 'मित्रांनो टेन्शन घेऊ नका...', कोरोनाबाधित पोलिसानेच दिला सहकाऱ्यांना धीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 06:04 IST2020-05-22T02:59:17+5:302020-05-22T06:04:01+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : मरोळ पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले संकेत राजेंद्र घोसाळकर असे या जिगरबाज पोलिसाचे नाव आहे. मीरारोड येथे आईवडील, पत्नीसह ते राहतात.

CoronaVirus News : 'मित्रांनो टेन्शन घेऊ नका...', कोरोनाबाधित पोलिसानेच दिला सहकाऱ्यांना धीर
- मनीषा म्हात्रे
मुंबई : ड्युटीवर असतानाच कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा कॉल आला. उपचारासाठी जातेवेळी सहकाऱ्यांचा निरोप घेताना ‘मित्रांनो टेन्शन घेऊ नका, लवकरच पुन्हा भेटतो’, असा धीर देत रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालय गाठले. घाबरलेल्या सहकाºयांना ते रुग्णालयातूनही धीर देत होते. उपचाराअंती कोरोनाशी दोन हाथ करून ते पुन्हा सेवेत रुजूही झाले.
मरोळ पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले संकेत राजेंद्र घोसाळकर असे या जिगरबाज पोलिसाचे नाव आहे. मीरारोड येथे आईवडील, पत्नीसह ते राहतात. त्यांचे वडील गोराई पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. संकेत गोरेगाव येथील अण्णाभाऊ साठे मार्गावर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बंदोबस्ताला होते. एके दिवशी ताप व खोकला येऊ लागल्याने ते स्थानिक डॉक्टरांकडे गेले. त्यांच्या सल्ल्यानुसार ट्रामा केअर रुग्णालयात गेले. ते धडधाकट दिसत असल्याने चाचणीची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ते अडून बसले. अखेर चाचणी करण्यात आली. तेथून ते कर्तव्यावर हजर झाले.
दरम्यान २१ तारखेला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा त्यांना कॉल आला. संकट मोठे होते. पण हिंमत कायम होती. त्या दिवशीची ड्युटी संपवून रुग्णवाहिकेत बसणार तोच वडील तेथे पोहोचले. खाकीतला बाप अस्वस्थ झाला. सहकारी मित्रांचेही डोळे पाणवले. सर्वांना धीर देत ते रुग्णवाहिकेत बसले. त्यांचा कोरोनाशी लढण्याची उमेद निर्माण करणारा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. खुद्द पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीही तो टिष्ट्वट केला.
सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू झाले. ‘मी मस्त आहे. तुम्हालाही काही होणार नाही’, असे सांगून ते सहकारी मित्रांमच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात लढण्याची उमेद निर्माण करत होते. कुटुंबीयांनाही क्वॉरंटाइन केले गेले. पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरू झाले. ते पत्नीलाही रोज व्हिडीओ कॉल करून धीर देऊ लागले. त्यांच्या सहकाºयांच्या चाचणीत एकाख् महिला पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सहाव्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी गेले. पुन्हा नव्या उमेदीने कर्तव्यावर रुजू झाले.
खंबीरपणे तोंड देणे गरजेचे
रुग्णालयाच्या खाटेपेक्षा आपली बाहेर जास्त जणांना गरज आहे. त्यामुळे लवकर बरे होऊन पुन्हा बंदोबस्तासाठी हजर राहायचे, एवढाच विचार मनात होता. खंबीरपणे प्रत्येक संकटाला तोंड देणे गरजेचे असते, असे संकेत यांनी सांगितले. अनेकदा कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. म्हणून वेळीच सावध होऊन पोलिसांनी स्वत: स्वत:ची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.