CoronaVirus News: 3,777 empty beds for patients; ICU - Oxygen Sour Excess - Commissioner Chahal | CoronaVirus News : रुग्णांसाठी ३,७७७ रिक्त खाटा; आयसीयू - ऑक्सिजन खाटा अधिक- आयुक्त चहल

CoronaVirus News : रुग्णांसाठी ३,७७७ रिक्त खाटा; आयसीयू - ऑक्सिजन खाटा अधिक- आयुक्त चहल

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील खाटांची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे. सध्या कोविड रुग्णांसाठी राखीव ३७७७ खाटा रिकाम्या असून एका आठवड्यात आणखी ११०० खाटा वाढविण्यात येणार आहेत. तर प्रत्येकी दोन हजार खाटांची तीन जम्बो रुग्णालये पुढील पाच ते सहा आठवड्यांत उभारणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी दिली.
मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत पोहोचला आहे. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे, यासाठी महापालिकेने टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कोविड रुग्णांसाठी सध्या १४१ रुग्णालयांमध्ये १९ हजार १५१ खाटा राखीव आहेत. यापैकी ३७७७ खाटा रिकाम्या आहेत.

पालिका खरेदी करणार दोन हजार रेमडेसिविर; किंमत मात्र जास्त
सध्या दर दिवसाला पालिकेला अडीच ते तीन हजार रेमडिसिविरची गरज पडते. त्यामुळे पालिकेने यापूर्वी मागविलेल्या दीड लाख इंजेक्शनमध्ये वाढ करून आता दोन लाख इंजेक्शन खरेदीचा निर्णय घेतला. पालिका रुग्णालय, काेविड केंद्रांत गरजू रुग्णांसाठी ते राखीव असेल. यापूर्वी ६५० रुपयांत घेतलेल्या इंजेक्शनसाठी आता तिप्पट पालिका प्रशासनाला दुप्पट ते तिप्पट रक्कम मोजावी लागेल, असे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, गेल्या आठवड्यात दोन लाख रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी ऑर्डर दिली आहे. पूर्वीपेक्षा याचा दर आता अधिक असला तरी रुग्णांचे जीव वाचविणे आमचे आद्य कर्तव्य आहे, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

आयसीयू, ऑक्सिजन खाटा वाढणार
काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयसीयू खाटा तसेच ऑक्सिजन खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. मात्र, लवकरच ३२५ आयसीयू खाटा वाढविणार असल्याने एकूण २४६६ आयसीयू खाटा यापुढे उपलब्ध होणार आहे. याशिवाय  आणखी आठवडाभरात वाढविण्यात येणाऱ्या ११०० खाटांपैकी एकूण १२५ आयसीयू खाटा असणार आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: 3,777 empty beds for patients; ICU - Oxygen Sour Excess - Commissioner Chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.