Coronavirus: दोन दिवसांत २३ हजारांहून अधिक वाहने मुंबईत जप्त; पोलिसांकडून १३७ ठिकाणी नाकाबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 01:41 IST2020-06-30T01:41:30+5:302020-06-30T01:41:49+5:30
वाहतूक पोलिसांनी रविवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल ८,६११ वाहने जप्त केली.

Coronavirus: दोन दिवसांत २३ हजारांहून अधिक वाहने मुंबईत जप्त; पोलिसांकडून १३७ ठिकाणी नाकाबंदी
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे सत्र सुरू होते. मुंबईत सोमवारी वाहतूक आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३० हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे दोन दिवसांत तब्बल २३ हजारांहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे कुठे वाद तर कुठे मुंबईकरांनी धसका घेतलेला दिसून आला.
सोमवारी पहाटेपासूनच मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांसह संपूर्ण शहरात १३७ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यात पोलिसांनी विनाकारण म्हणजे खरेदी, नातेवाइकांची भेट तसेच विविध कारणांसाठी प्रवास करणाºयांची वाहने थेट जप्त करत होते. तसेच मास्क न घालणाºयांवरही कारवाई करण्यात आली. जप्त केलेली वाहने नागरिकांना न्यायालयातून सोडवून घ्यावी लागणार आहेत. तर अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण सांगणाºयांच्या तपशिलाची संपूर्ण खातरजमा करूनच त्यांना पुढे जाऊ दिले जात होते.
मुंबई पोलिसांच्या १२ परिमंडळ तसेच पोर्ट झोनअंतर्गत सोमवारी ३० हजार ७२ वाहनांची तपासणी केली. यात ११,५७९ दुचाकी, १,३६६ तीन चाकी तर ६,६४० चारचाकी वाहनांचा समावेश होता. त्यापैकी ७,६८० वाहने जप्त करण्यात आली आहे. यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत ६,८६० जणांवर कारवाई करण्यात आली. तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८ अंतर्गत ६४५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
तर वाहतूक पोलिसांनी रविवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल ८,६११ वाहने जप्त केली. यात ६,२४१ दुचाकींचा समावेश आहे. यात दोन दिवसांत वाहतूक आणि मुंबई पोलिसांकड़ून केलेल्या कारवाईत २३ हजारांहून अधिक वाहने जप्त केली आहेत.
नागरिकांना नियमांची आठवण करून देणे गरजेचे
पुन:श्च हरिओमअंतर्गत विविध परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्याच सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.- प्रणय अशोक, मुंबई पोलीस प्रवक्ते