CoronaVirus News: राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण; उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 13:48 IST2020-06-23T13:46:43+5:302020-06-23T13:48:34+5:30
चालकांवर सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू; दोघांची प्रकृती स्थिर

CoronaVirus News: राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण; उपचार सुरू
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज ठाकरे घरीच आहेत. याआधी राज ठाकरेंच्या दोन सुरक्षा रक्षकांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.
राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो. राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळलं आहे. राज यांच्या घरात काम करणारे कर्मचारीदेखील विशेष काळजी घेत आहेत. याआधी राज यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. ते कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. याच पोलिसांच्या संपर्कात आल्यानं चालकांना कोरोना झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याजवळील एक चहा विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर या परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचारी बदलण्यात आले. ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातल्या तिघांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.