Coronavirus: मिशन झिरो: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिका सदैव तत्पर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 04:02 AM2020-07-02T04:02:32+5:302020-07-02T04:02:45+5:30

कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू रोखण्यासाठी मोहीम

Coronavirus: Mission Zero: Municipal Corporation is always ready for the health of Mumbaikars | Coronavirus: मिशन झिरो: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिका सदैव तत्पर

Coronavirus: मिशन झिरो: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिका सदैव तत्पर

Next

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात शंभर दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण नियंत्रणात आले आहे. आता रुग्णाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘मिशन झिरो’ जाहीर केले आहे. त्याचबरोबर ‘सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी’च्या माध्यमातून कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.

मुंबईत ९ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर या महामारीविरोधात युद्ध सुरू आहे. एप्रिल महिन्यात तीन दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याने मे अखेरीपर्यंत एक लाख रुग्ण मुंबईत असतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. मात्र गेल्या तीन महिन्यांत लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने कडक उपाययोजना आखल्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ४१ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. तसेच हॉटस्पॉट विभागात कोरोनावर मात केल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करीत असताना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे. यामुळे महापालिकेने कोविड केअर सेंटर, स्वतंत्र रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे एक लाख खाटा उपलब्ध केल्या आहेत. तसेच अतिदक्षता विभागातील खाटा, व्हेंटिलेटर, आॅक्सिजनची संख्याही वाढवण्यात आली आहे.

अशी घेणार आरोग्याची काळजी

  • लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर उच्चभ्रू वसाहतींमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांना खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. मलबार हिल, पेडर रोड येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये पालिकेचे पथक तपासणी करीत आहे. 
  • पावसाळ्यात कोरोनाच्या बरोबरीने साथीचे आजारही बळावण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून प्रत्येक रविवारी विभाग स्तरावर आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
  • मिशन युनिवर्सलअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या किटमुळे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना चाचणी अहवाल उपलब्ध होणार आहे. याचा वापर यापुढे जास्तीत जास्त केला जाणार आहे
  • पुढील काही महिने अँटिव्हायरल, अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड, प्लाझ्मा यांसह औषधांचा पुरेसा साठा पालिका रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. 
  • कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग पडताळण्यासाठी बिगर शासकीय संस्थांच्या सहकार्याने एम पश्चिम (चेंबूर, टिळकनगर), एफ उत्तर (सायन-वडाळा) आणि आर उत्तर (दहिसर) या तीन विभागांमध्ये सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे.


असे होत गेले बदल
मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने गेले तीन महिने प्रचंड तणावाचे ठरले. विभाग स्तरावर स्थापन कोरोना वॉर रूमच्या माध्यमातून बाधित रुग्णाला आवश्यकतेनुसार रुग्णालयात खाट उपलब्ध करून देण्यात येते. 

  • मालाड ते दहिसर, भांडुप-मुलुंडमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी सरासरीपेक्षा अधिक आहे. यामुळे मिशन झिरो, डॉक्टर आपल्या दारी ही मोहीम सुरू करण्यात आली.
  • चेसिंग द व्हायरस मोहिमेद्वारे एका बाधित रुग्णामागे १५ हाय रिस्क गटातील लोकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. 
  • झोपडपट्टीतील बाधित संशयित व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.  प्रतिबंधित क्षेत्रात अन्नधान्य वाटप, नागरी सुविधा, दैनंदिन गरजा पुरवण्यात आल्या.

Web Title: Coronavirus: Mission Zero: Municipal Corporation is always ready for the health of Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.