CoronaVirus News: काल मुख्यमंत्र्यांचा इशारा, आज कारवाई; अखेर 'त्या' अधिकाऱ्याची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 13:05 IST2020-05-09T13:04:44+5:302020-05-09T13:05:09+5:30
CoronaVirus Marathi News: काल राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते

CoronaVirus News: काल मुख्यमंत्र्यांचा इशारा, आज कारवाई; अखेर 'त्या' अधिकाऱ्याची उचलबांगडी
मुंबई: सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत सायन रुग्णालयातले दोन व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामुळे पालिका प्रशासन आणि सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरुन इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नायर रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी गलथानपणा खपवून घेतला जाणार नाही, असं निक्षून सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच इंगळे यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या जागी रमेश भारमल यांची नियुक्ती करण्यात आली असून ते आता २४ तास रुग्णालयातच राहणार असल्याचं समजतं.
रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवण्यात आल्यानं टीका
आमदार नितेश राणे यांनी सायनमधील धक्कादायक व्हीडिओ ६ मे रोजी ट्विट केला होता. हा व्हीडिओ वॉर्ड नंबर ५ मधील असल्याचे सांगितले जाते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर पालिकेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
कोरोना रुग्ण पळून गेल्याचा प्रकार
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल सायन रुग्णालयातल्या वॉर्ड क्रमांक ५ मधील एक व्हिडीओ ट्विट केला. या व्हिडीओमध्ये एक कोरोना रुग्ण खिडकीतून पळून जात असल्याचं दिसत होतं. त्यावरुन त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं होतं.