Join us  

Coronavirus: लस मिळेपर्यंत 'लॉकडाऊन' हा उपाय नाही, राज ठाकरेंचे सरकारला अनेक सवाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 9:35 AM

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी परप्रांतीय मजूरांच्या मुद्यांसह काही महत्वाच्या सूचना मांडल्या आहेत. तसेच, राज्य सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोरोनाचा मुकाबला करण्यासंदर्भात सूचनांचा पाऊस पडला. मुंबई असो वा पुणे किंवा नागपूर कुठेही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसत नाही. राजकीय नेतृत्वाने अशावेळी समन्वय राखायचे काम करावे, अशी सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर लॉकडाऊनच्या काळात परिस्थिती हाताळण्यासाठी एसआरपीला बोलवा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी परप्रांतीय मजूरांच्या मुद्यांसह काही महत्वाच्या सूचना मांडल्या आहेत. तसेच, राज्य सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं सरकार कसं निराकरण करणार आहे ? अगदी आयत्यावेळी सांगून जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही, असा सवाल राज यांनी विचारला आहे. राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन सरकारला हे प्रश्न विचारले आहेत. 

कंटेनमेंट झोनच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल . पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपी फौज आवश्यक आहे. पोलिसांना लोकही गृहीत धरताहेत. अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकेल आहेत त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था व्हावी. परप्रांतीय कामगार आज ना उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता, परत राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी. तसेच यापुढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सूचना द्यावी, असेही राज म्हणाले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं सरकार कसं निराकरण करणार आहे ? अगदी आयत्यावेळी सांगून जनतेला गोंधळात टाकण्यापेक्षा योजनाबद्ध पद्धतीने टाळेबंदी शिथिल करावी, कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही.

शासकीय कर्मचारी, महापालिका कर्मचारी, सफाई कामगार ह्यांना सुरक्षा साधनं अपुरी पडत आहेत, त्यांना मुबलक सुरक्षा साहित्य पुरविण्यात यावं. शैक्षणिक वर्ष आता काही दिवसात सुरु होणार आहे तेव्हा शाळा कशा आणि कधी सुरु होणार? ह्यांची स्पष्टता सरकारतर्फे येणं आवश्यक आहे जेणेकरून पालकांची चिंता कमी होईल, असे विविध प्रश्न राज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारले आहेत. 

आणखी वाचा

'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'

Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेपोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई