Coronavirus, Lockdown News: नागरिकांना दिलासा; शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 03:08 AM2020-05-04T03:08:11+5:302020-05-04T07:15:36+5:30

कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम : पुणे, मुंबईतील खासगी कार्यालये बंद

Coronavirus, Lockdown News: Consolation to citizens; All shops except shopping malls open from today | Coronavirus, Lockdown News: नागरिकांना दिलासा; शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू

Coronavirus, Lockdown News: नागरिकांना दिलासा; शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू

Next

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव असलेले कंटेनमेंट झोन वगळता, इतर भागांतील शॉपिंग मॉल वगळता जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची सर्व एकल (स्टँड अलोन) दुकाने सोमवारपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे, तसेच ग्रीन व आॅरेंज झोनमधील खासगी कार्यालये १०० टक्के सुरू होत आहेत. त्यामुळे सोमवारपासून लोकांना बराच मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई (एमएमआर) व पुणे प्रदेश (पीएमआर) मधील खासगी कार्यालये बंदच राहणार असून, येथील केंद्र व राज्य शासनाची कार्यालयेही ५ टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील, तर इतर झोनमधील शासकीय व खासगी कार्यालयेही ३३ टक्के मनुष्यबळ वापरून सुरू राहतील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे देशभर लागू करण्यात आलेला लॉकडाउनचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे.

लॉकडाउनच्या काळात काय सुरू होणार आणि काय बंद राहणार याची नवी नियमावली राज्य सरकारने जारी केली आहे. यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे.

काय सुरू होईल?

इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल, स्टेशनरी, मद्य यांच्यासह इतर दुकाने सुरू होतील, तसेच अनेक ठिकाणी आता कुरिअर सेवा सुरू होणार आहे. पोस्ट सुरू होतील, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरू होतील, तसेच काही ठिकाणी खासगी व सरकारी कार्यालयेही सुरू होतील, असे शासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

कंटेनमेंट झोन वगळता इतर झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल दुकाने सुरू करण्याची सवलत आहे. एकल दुकाने याचा अर्थ, ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाचपेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने, असा असेल. (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून) कोणते दुकान एकल आहे की नाही, याचा निर्णय स्थानिक प्रशासन करील. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील.

मुंबईतून रेल्वे सुटणार नाही
कंटेनमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व निर्बंध असणार असून, जीवनावश्यक वस्तू नसलेली एकल दुकाने व बांधकामांनाही या झोनमध्ये बंदी असणार आहे. मुंबई व पुणे प्रदेशासह रेड व कंटेनमेंट झोनमधील ब्युटीपार्लर, केशकर्तनालय, सलून व स्पा सुरू करण्यास अद्याप निर्बंध लागू आहेत, तसेच मुंबईमध्ये कंटेनमेंट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाºया मजुरांसाठी रेल्वे सोडण्यात येणार नाही.

या गोष्टी राहणार बंदच
विमान, ट्रेन, मेट्रो किंवा आंतरराज्य रस्ते वाहतुकीस बंदी कायम असेल. मात्र, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स सुरू ठेवता येणार नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारच्या सभा-संमेलने घेता येणार नाहीत आणि धार्मिक स्थळेही सुरू ठेवता येणार नाहीत.

बांधकामांना परवानगी
नव्या अधिसूचनेनुसार रेड झोनमध्ये मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची, तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही मुंबई आणि पुणे महानगर प्रदेशात ही परवानगी नसेल. ज्या रेड झोन भागात बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय असणे बंधनकारक राहील.

Web Title: Coronavirus, Lockdown News: Consolation to citizens; All shops except shopping malls open from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.