Join us  

मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी 10 ट्रेन सुटणार; फडणवीस रेल्वेमंत्र्यांशी बोलले, आदित्यनाथही तयार झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 5:10 PM

Coronavirus Lockdown News: घराच्या ओढीनं पायी निघालेल्या 16 मजुरांचा औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं स्थलांतरित मजुरांच्या घरी परतण्याचा विषय ऐरणीवर आला आहे.

लॉकडाऊनमुळे घरच्यांपासून दूर अडकलेले स्थलांतरित मजूर घराच्या ओढीनं मैलोनमैल पायी चालत जात असल्याचं चित्र सगळ्यांनाच अस्वस्थ करतंय. अशाच, घराकडे निघालेल्या 16 मजुरांचा औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत झालेला मृत्यू तर देशाला चटका लावून गेलाय. या पार्श्वभूमीवर, मजुरांच्या घरी परतण्याचा विषय ऐरणीवर आला असतानाच, उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या मजुरांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. मुंबईत वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राने विशेष ट्रेन उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, पीयूष गोयल यांनी लगेचच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी 10 ट्रेन सोडण्यात येणार असल्याचं निश्चित झालं आहे.

देशभरात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे ट्रेन सोडायला केंद्र सरकार तयार असताना, आपण त्यांच्याकडे तशी मागणी करायला हवी, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केली होती. 

कोरोनाच्या संकटातून सुटका कधी होईल आणि लॉकडाऊन कधी संपेल, याबद्दल सगळीच अनिश्चितता आहे. त्यामुळे रोजगारासाठी गावं सोडून शहरात आलेल्या मजुरांचं जगणं अवघड झालंय. हजारो गरीब मजूर-कामगार आपलं बिऱ्हाड पाठीवर घेऊन घरी निघालेत. त्यांची ही पायपीट कुणालाच पाहवत नाहीए. मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनीही, हे दृश्यं वेदनादायी आणि व्यथित करणारं असल्याची भावना व्यक्त केलीय. 

अशा परिस्थितीत, मजुरांना सुखरूप त्यांच्या गावी, घरी पोहोचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी वेगाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होतेय. औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेनं तर, या मजुरांचं स्थलांतर किती गंभीर आणि संवेदनशील विषय आहे, याची जाणीव करून दिली आहे. त्याची गांभीर्यानं दखल घेऊन, देवेंद्र फडणवीस आज पीयूष गोयल यांच्याशी बोलले. उत्तर प्रदेशातील मजुरांसाठी ट्रेन सोडायची, तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनाही विश्वासात घेणं गरजेचं असल्यानं, पीयूष गोयल यांनी योगी आदित्यनाथ यांना फोन केला. त्यांनीही ग्रीन सिग्नल दिल्यानं आता लवकरच मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या 10 ट्रेनना हिरवा कंदील मिळू शकणार आहे.  

संबंधित बातम्याः 

महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

सोमवारपासून लालपरी धावणार, शहरात अडकलेल्यांना फुकटात गावी सोडणार

'हे' कोरोना अन् लॉकडाऊनचेच बळी, मजुरांसाठी सरकारने नेमकं केलं काय?; शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

जयंत पाटलांनी ४८० जणांची घरवापसी केली, सांगलीतून १६ बस रवाना

स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टा संपेना; ‘लोकमत’चा राज्यभरातून ग्राउंड रिपोर्ट

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यादेवेंद्र फडणवीसऔरंगाबाद रेल्वे दुर्घटनापीयुष गोयलयोगी आदित्यनाथ