मुंबई : कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे पोलिसांवरचा ताण वाढत आहे. तसेच आपल्यामुळे कुटुंबीयांना त्रास नको म्हणून भीतीही वाढतेय. मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाच्या मुलीने ‘बाबांसह महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत, देवाला त्यांची काळजी घे,’ असे लिहिलेले ग्रिटिंग तयार केले आहे.
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. त्यात १०९६८ जण होम क्वारंटाइन आहे. अशांवर नजर ठेवण्याबरोबरच विविध बंदोबस्तांची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. मुंबईत १४६ ठिकाणे सील करण्यात आली आहेत. या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना घरी जाण्याचीही भीती वाटते.घराबाहेर पडल्यावर चेहऱ्यावर सतत मास्क असतोच. हातातील काठीपासून वाहनापर्यंत सारेच निर्जंतुक केले जाते. थेट संपर्क, हात मिळवणे आदी गोष्टी जितक्या टाळता येतील तितक्या टाळतो. भरउन्हात गरम पाण्यावर भर असतो. घरी परतल्यावर कपडे डेटॉलच्या पाण्यात भिजवणे, आंघोळ आदी प्रक्रिया असतेच. जास्तीत जास्त काळजी घेऊन आम्ही नेमून दिलेले कर्तव्य पार पाडतो. पण कुटुंबाची काळजी मात्र काही केल्या कमी होत नाही, असे सील केलेल्या परिसराबाहेर तैनात असलेल्या पोलिसाने सांगितले.
तर, कोरोनाची लागण कुठून कशी होईल सांगता येत नाही. त्यामुळे घरी गेलो तरी स्वत:लाच होम क्वारंटाइन केल्यासारखे जगत असतो. मुलांना जवळ घेण्याचीही भीती वाटते असेही एका पोलीस निरीक्षकाने सांगितले.यातच पोलीस बाबासाठी सुरक्षेसाठी तयार केलेले ग्रिटिंग पाहून मुंबई पोलीस दलातील मनेश कदम यांनाही धीर मिळाला. त्यांच्या मुलीने त्यात आमच्यासाठी अहोरात्र काम करणाºया बाबासह महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानत पोलिसाची मुलगी असल्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. ‘देवा त्यांच्यावर लक्ष असूदेत. त्यांची काळजी घे, अशा आशयाचे ग्रिटिंग तयार करत त्यावर वडिलांचा फोटो चिकटवला.’ सोशल मीडियावर हे ग्रिटिंग व्हायरल झाले. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला.घरच्यांची सतत काळजी असतेच