Coronavirus : कस्तुरबात वॉरियर्सचा कोरोनाशी लढा, विमानतळावरही अहोरात्र सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:27 AM2020-03-20T01:27:03+5:302020-03-20T01:27:07+5:30

एरवी सरकारी व पालिका रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग केवळ सकाळच्या वेळेत सुरू असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग तीन पाळ्यांमध्ये सुरू आहे.

Coronavirus : Kasturba Warriors Fight against Corona | Coronavirus : कस्तुरबात वॉरियर्सचा कोरोनाशी लढा, विमानतळावरही अहोरात्र सेवा

Coronavirus : कस्तुरबात वॉरियर्सचा कोरोनाशी लढा, विमानतळावरही अहोरात्र सेवा

googlenewsNext

मुंबई : कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून मुंबईतील पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टरांसह पॅरावैद्यकीय कर्मचारी अहोरात्र रुग्णांच्या सेवेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ही मंडळी खऱ्या अर्थाने ‘वॉरियर्स’प्रमाणे लढत आहेत. त्याचप्रमाणे, पालिकेच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा चमूही विमानतळावर मागील कित्येक दिवस ठाण मांडून प्रवाशांचे स्क्रिनिंग करत आहे. त्यामुळे या ‘हेल्थ वॉरियर्स’च्या कामाला सॅल्यूट करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईकरांनीही प्रशासनास सहकार्य करावे, अशी भावना वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

एरवी सरकारी व पालिका रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग केवळ सकाळच्या वेळेत सुरू असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग तीन पाळ्यांमध्ये सुरू आहे. या तीन पाळ्यांत वीस डॉक्टर, पाच परिचारिका, तसेच पाच वॉर्डबॉय काम करतात. तर आयसोलेशन वॉर्डमध्ये १२ डॉक्टर, सात परिचारिका व सात इतर साहाय्यक कर्मचारी आहेत. या रुग्णालयातील विलगीकरण कक्ष, बाह्यरुग्ण विभागातील स्वच्छता आणि रुग्णालय आवारातील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे.

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाविषयक वैद्यकीय प्रयोगशाळा असल्याने येथे पाच वैद्यकीय तज्ज्ञ आलेल्या नमुन्यांच्या तपासण्या करण्यामध्ये व्यस्त आहेत. बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारण ४००-५०० रुग्ण येतात, गेल्या चार दिवसांत येथे दोन हजारांहून अधिक नमुने तपासण्यात आले. कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असलेल्यांच्या कस्तुरबा रुग्णालयात चाचण्या करण्यात येत आहेत. शहरात कोरोनाच्या तपासणीसाठी बाधित देशातून प्रवास करून आलेले आणि लक्षणे आढळलेले अनेक रुग्ण कस्तुरबात गर्दी करत आहेत.

१२० जणांची टीम कार्यरत
मागील काही दिवसांत यंत्रणांवरील कामाचा ताण वाढला आहे, मात्र पालिका प्रशासनांतर्गत काम करत असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि संपूर्ण पॅरावैद्यकीय चमू अत्यंत कसोशीने काम करत आहे. सध्या पालिकेचे सुमारे १२० जण कोरोनाविरोधातील लढ्यात कार्यरत आहेत, यात विशेषज्ञांसह अन्य वैद्यकीय अधिकारी-कर्मचाºयांचा समावेश आहे.
- डॉ. रमेश भारमल, वैद्यकीय संचालक, पालिका रुग्णालय

तीन पाळ्यांत पाच टीम
पालिकेच्या वतीने सध्या मुंबई विमानतळावर १३५ डॉक्टर्स आणि ८० पॅरावैद्यकीय कर्मचारी आहेत. विमानतळावर शरीराचे तापमान, लेझर तापमान अशी वैद्यकीय तपासणी होत आहे. शिवाय, साठ वयाच्या पुढे असणाºयांचे थेट अलगीकरण करण्यात येत आहे, तर ज्यांच्यामध्ये कोणतीच लक्षणे नाहीत त्यांना घरगुती अलगीकरणाचा शिक्का मारून घरी पाठविण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांचा चमू घरी न जाता विमानतळावर अविरत सेवा देत आहे. - डॉ. संतोष रेवणकर, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी , पालिका आरोग्य विभाग

घरोघरी सर्वेक्षण
कोरोनाबाधितांसाठी अलगीकरण, तर संशयितांना विलगीकरण करण्याची व्यवस्थाही पालिकेने केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेनेही कंबर कसली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील १०६७ वैद्यकीय पथके कर्मचारी, तसेच आरोग्य स्वयंसेविका घरोघरी जाऊन नागरिकांशी कोरोनाविषयी संवाद साधत आहेत.

केईएममध्ये चाचण्या सुरू रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी केईएम रुग्णालयात प्रयोगशाळा गुरुवारी सुरू झाली आहे. या प्रयोगशाळेत सध्या दोन पाळ्यांत नऊ जणांचा चमू काम करत आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्ण येणार नाही. किंवा बाह्यरुग्ण विभागही नसणार आहे. केवळ कस्तुरबा रुग्णालयाच्या वतीने पाठविण्यात येणाºया नमुन्यांची तपासणी केईएममधील प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. - डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Web Title: Coronavirus : Kasturba Warriors Fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.