coronavirus: लोकमान्य, वागळे, मुंब्य्रात कोरोना रुग्णांत वाढ; झोपडपट्ट्यांची संख्या अधिक असल्याने ठाणे महापालिकेला चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 03:31 AM2020-05-16T03:31:52+5:302020-05-16T03:32:21+5:30
ठाणे शहराचा आजचा विचार केला, तर या तीनही प्रभागांत मिळून तब्बल ५४० च्या आसपास रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. मार्च, एप्रिल महिन्यांत ही संख्या कमी होती. मात्र, मागील १५ दिवसांत ती गुणाकाराने वाढत आहे.
ठाणे : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून यात लोकमान्यनगर, वागळे इस्टेट आणि मुंब्य्रात रुग्णांची वाढणारी संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. लोकमान्य आणि वागळे इस्टेट हा पट्टा अनिश्चित कालावधीसाठी बंद केला असून लोकमान्यनगरात रुग्णांची संख्या २००, तर वागळे इस्टेट भागात पावणेदोनशे आणि मुंब्य्रात ही संख्या १५० च्या घरात गेली आहे. येथील परिसर हा संपूर्णपणे झोपडपट्ट्यांंचा असल्याने त्यावर उपाययोजना कशा करायच्या, असा पेच महापालिकेला सतावू लागला आहे.
ठाणे शहराचा आजचा विचार केला, तर या तीनही प्रभागांत मिळून तब्बल ५४० च्या आसपास रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. मार्च, एप्रिल महिन्यांत ही संख्या कमी होती. मात्र, मागील १५ दिवसांत ती गुणाकाराने वाढत आहे.
लोकमान्यनगर भागात तर रोज नवीन १० ते २० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही संख्या कमी कशी करायची, कोणत्या उपाययोजना करायच्या, असा पेच महापालिकेला सतावू लागला आहे. आजघडीला या भागात २३० रुग्ण आढळले आहेत. तिकडे वागळे इस्टेटमध्ये १६७ हून अधिक रुग्ण आहेत. तसेच मृत्यू पावलेल्यांमध्येही येथील रुग्ण अधिक आहेत. हा भाग पूर्णपणे दाटीवाटीचा आणि गर्दीचा आहे. घराला लागून घरे असून झोपडपट्टीने व्यापला आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होताना दिसत आहे. लोकमान्यनगर आणि वागळे प्रभाग समितीमधील अत्यावश्यक सेवेतील दुकानेही आता अनिश्चित कालावधीसाठी बंद केली आहेत. असे असतानाही आता या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
आवाहनांकडे होत आहे दुर्लक्ष
आजही नागरिक सर्व सेवा बंद असतानाही रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. पालिका आणि पोलिसांकडूनही नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनही हतबल झाले आहे. दुसरीकडे मागील काही दिवस मुंब्य्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही कमी वाटत होती. मात्र, मागील चार ते पाच दिवसांत पुन्हा येथील रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
पालिका कर्मचाऱ्यास कोरोना
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेत कार्यरत असलेल्या आणि मुंबईहून प्रवास करणाºया एका महिला कर्मचाºयास कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने या महिला कर्मचाºयास कोरोना झाला आहे. ज्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे, ती पालिकेतही येऊन गेल्याने तिच्या संपर्कात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही धोका निर्माण झाला आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाºयांची चाचणी करण्यात येणार आहे.
कल्याण-डोंबिवलीत १८१ रुग्ण कोरोनामुक्त
कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीने ४०० चा आकडा पार केला आहे. मात्र, त्यापैकी १८१ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त होणाºया रुग्णांचे प्रमाण हे ४६ टक्के आहे. गुरुवारी एकाच दिवसात ५१ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गुरुवारपर्यंत ३९१ कोरोना रुग्णांची संख्या होती. कल्याण-डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. हे रुग्ण कल्याण-डोंबिवलीत वास्तव्याला असले, तरी यातील अनेक जण सरकारी व खाजगी अत्यावश्यक सेवेत मुंबईला कार्यरत आहेत.
पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, पाणीपुरवठा खात्यातील कर्मचारी, रुग्णवाहिकेसह परिवहन बसवरील चालक यांचा समावेश आहे. गुरुवारी बरे झालेल्या रुग्णांपैकी २७ रुग्ण हे टाटा आमंत्र, होलिक्रॉसमधील पाच आणि आर.आर. रुग्णालयातील आठ रुग्ण आहेत. तर, अन्य ११ बरे झालेले रुग्ण इतर रुग्णालयांतून बरे होउन परतले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ३५ दिवसांचे बाळ, दोन महिन्यांचे बाळ आणि आठ वर्षांच्या लहान मुलीचा समावेश आहे.
कल्याण-डोंबिवलीत नवे ३३ रुग्ण
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे ३३ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच, शुक्रवारी कोरोनामुळे डोंबिवली पूर्वेत एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या नऊ झाली आहे. तर, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४२४ झाली आहे. मृताचे वय ७५ असून तो राहत असलेल्या परिसरातील किराणा दुकानातील कामगाराला कोरोना झाला होता. त्याच्या संपर्कातून त्याला कोरोना झाला होता. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. किराणा मालाच्या दुकानातील बाधिताच्या संपर्कात आलेल्या सहा जणांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी सहा महिला आणि २७ पुरुष असून कल्याण पूर्वेतील आठ, डोंबिवली पूर्वेतील आठ, कल्याण पश्चिमेतील ११, डोंबिवली पश्चिमेतील चार आणि मांडा-टिटवाळा परिसरातील दोन रुग्णांचा समावेश आहे.