Join us  

coronavirus: उपहारगृहे उघडण्याबाबतच्या सरकारच्या नियमांत स्पष्टता हवी , हॉटेल असोसिएशनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 4:10 AM

आधी शंभर टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्याचे सांगून नंतर केवळ हॉटेलमध्ये मुक्काम असणाऱ्या ग्राहकांसाठीच उपाहारगृहे उघडता येतील, असा सुधारित आदेश देण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

मुंबई : राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला प्रतिबंधित कामांच्या यादीतून वगळले आहे. आधी शंभर टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्याचे सांगून नंतर केवळ हॉटेलमध्ये मुक्काम असणाऱ्या ग्राहकांसाठीच उपाहारगृहे उघडता येतील, असा सुधारित आदेश देण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राज्य सरकारने तातडीने स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गुरबक्षसिंग कोहली यांनी केली आहे.राज्य सरकारने ३१ आॅगस्टला मिशन बिगिन अगेनअंतर्गत नवीन नियमावली जारी केली. यात हॉटेल (उपाहारगृहे) आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, बुधवारी यात सुधारणा करण्यात आली. जे ग्राहक हॉटेलमध्ये मुक्कामाला असतील त्यांच्यासाठी उपाहारगृहात सेवा देता येईल, असा खुलासा सरकारकडून करण्यात आला.या सर्व पार्श्वभूमीवर गुरूबक्षसिंग म्हणाले की, प्रतिबंधित कामांच्या यादीतून हॉटेल आणि रेस्टॉरंटना वगळण्यात आले आहे. तसेच पूर्ण क्षमतेने उपाहारगृहे सुरू करण्याचाही उल्लेख आहे. आमचा व्यवसाय प्रतिबंधित कामांच्या यादीत येत नसल्याने आता निर्बंध नाहीत, असा आमचा समज झाला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांच्या मनात या आदेशाबाबत शंका आणि संभ्रम असून राज्य सरकारने याबाबत तातडीने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.इग्लंडमध्ये विविध योजनाइंग्लंडसारख्या देशात हॉटेल उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. लोकांनी हॉटेलमध्ये खावे, यासाठी योजना आहे. आपल्याकडेही असे चांगले उपक्रम सुरू व्हायला हवेत. आरोग्यदायी, निरोगी खानपान उद्योगासाठी ते आवश्यक आहेत, असे असोसिएशनचे माजी अध्यक्ष कमलेश बरोत म्हणाले.कोरोनामुळे व्यवसाय अडचणीतकोरोनाच्या संकाटामुळे राज्यातील रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली असली तरी यातून या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही.अनेक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंट सुरू होणे आवश्यक आहे.यासाठी आवश्यक असणारे फिजिकल डिस्टन्सिंगसारखे सर्व दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टिष्ट्वट करून केली आहे. 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉकमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसहॉटेलमहाराष्ट्र सरकार