CoronaVirus: 'Homeowner, action on housing society' | CoronaVirus : ‘घरमालक, हाउसिंग सोसायटीवर होणार कारवाई’

CoronaVirus : ‘घरमालक, हाउसिंग सोसायटीवर होणार कारवाई’

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी सध्या युद्धपातळीवर कार्यरत आहेत. राज्यात काही ठिकाणी भाडेतत्त्वावरील घरात राहणाऱ्या या डॉक्टरांना मात्र भलत्याच अडचणींना सामारे जावे लागत आहे. डॉक्टर किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमुळे आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने काही घरमालक आणि गृहनिर्माण संस्था त्यांना घर सोडण्यास सांगत आहेत. या प्रकाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. घरमालक आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्त्व लक्षात घेऊन सहकार्याची भूमिका घ्यावी. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा सोसायटीवर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
सध्या करोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. तरीही घरमालक किंवा सोसायट्यांनी त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच, परंतु नियमबाह्यही आहे. एखादे घरमालक किंवा हाउसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
भाड्याच्या घरात राहणारे डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: 'Homeowner, action on housing society'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.