Join us  

coronavirus: "कोरोनाला रोखण्यासाठी सरकार अधिक कठोर पावले उचलणार, मेमध्येही महाराष्ट्रात निर्बंध लागू राहणार’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 9:04 AM

coronavirus in Maharashtra : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील हे निर्बंध १ मेनंतरही वाढवण्यात येऊ शकतात, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकाही ठिकाणी कोविड-१९ च्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सीआरपीसीच्या कलम १४४ च्या उल्लंघनाचे प्रकार दिसून आलेराज्यात कोरोनामुळे ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे ते पाहता राज्यात लावण्यात आलेले निर्बंध मे महिन्यापर्यंत पुढे वाढवण्यात येऊ शकतात ही बाब कोरोनाच्या स्थितीवर अवलंबून असेल

मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. त्यात कोरोनाच्या या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. (coronavirus in Maharashtra ) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंल लागू राहणार आहेत. मात्र राज्यातील हे निर्बंध १ मेनंतरही वाढवण्यात येऊ शकतात, असे संकेत आरोग्यमंत्रीराजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत. ( Health Minister Rajesh Tope Says, "Maharashtra Government to take tougher measures to curb coronavirus, restrictions to be imposed in Maharashtra in May")

आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. आम्ही अजूनही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. काही ठिकाणी कोविड-१९ च्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सीआरपीसीच्या कलम १४४ च्या उल्लंघनाचे प्रकार दिसून आले आहेत. राज्यात कोरोनामुळे ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे ते पाहता राज्यात लावण्यात आलेले निर्बंध मे महिन्यापर्यंत पुढे वाढवण्यात येऊ शकतात. मात्र ही बाब कोरोनाच्या स्थितीवर अवलंबून असेल. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. 

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी १५ दिवसांसाठी निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधांनंतर राज्यात जे परिणाम समोर येतील, त्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल. राज्यातील लोक या निर्बंधांना सहकार्य करत आहेत, असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रोजी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात विविध निर्बंधांची घोषणा केली होती. 

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या फैलावाचा वेग कायम आहे. राज्यात शनिवारी कोरोनाच्या ६७ हजार १२३ नव्या रुग्णांचे निदान झाले होते. तर दिवसभरात ४१९ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ३७ लाख ७० हजार ७०७ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत ५९ हजार ९७० जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजेश टोपेमहाराष्ट्र सरकारआरोग्य