coronavirus: मुंबईत चार लाख ९१ हजार जण अद्याप होम क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 03:16 AM2020-10-28T03:16:16+5:302020-10-28T03:16:49+5:30

Mumbai coronavirus News : सध्या मुंबईत १९ हजार ७२१ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ११ हजार ५५३ रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. अशा रुग्णांना घरीच उपचार घेण्यास सांगण्यात आले आहे. 

coronavirus: Four lakh 91 thousand people are still home quarantined in Mumbai | coronavirus: मुंबईत चार लाख ९१ हजार जण अद्याप होम क्वारंटाइन

coronavirus: मुंबईत चार लाख ९१ हजार जण अद्याप होम क्वारंटाइन

Next

मुंबई : कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने पालिका रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील ५० टक्के खाटा रिकाम्या आहेत. मात्र बाधित रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्ती तसेच कोणतीही लक्षणे नसलेले  चार लाख ९१ हजार २४८  मुंबईकर अद्यापही होम क्वारंटाइन आहेत. 

तर आजच्या घडीला स्वतंत्र खोलीची व्यवस्था नसलेले ९६५ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. सध्या मुंबईत १९ हजार ७२१ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ११ हजार ५५३ रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. अशा रुग्णांना घरीच उपचार घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत ३१ लाख ६१ हजार ८९७ मुंबईकरांनी होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे.  

गृह विलगीकरणासाठी काय अटी?
मार्च महिन्यात बाधित रुग्णाच्या संपर्कातील अति जोखमीचे व्यक्तींना (घरात स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था) गृह विलगीकरणात ठेवण्यात येत होते. मे महिन्यापर्यंत लक्षणे नसलेले रुग्णही रुग्णालयात दाखल होऊ लागले. यामुळे गरजू रुग्णाला खाट उपलब्ध होत नव्हती. सध्या कोणतीही लक्षणे नसलेले रुग्ण, संशयित रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. 

प्रशासनाची गृह विलगीकरणासाठी काय व्यवस्था ? 
सर्वच २४ प्रशासकीय विभागांमध्ये महापालिकेने स्वतंत्र वॉर रूमची स्थापना केली आहे. येथे २४ तास पालिकेचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात. होम क्वारंटाइन, बाधित रुग्णांची यादी दररोज सकाळी या वॉर रूमकडे आल्यानंतर संबंधित कर्मचारी प्रत्येक रुग्णाला दूरध्वनी करून त्यांची नियमित विचारपूस करतात. तसेच आवश्यकता असल्यास एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिका व रुग्णालयात खाट उपलब्ध करून देण्यात येते. 

गृह विलगीकरणात असलेल्या प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीवर पालिकेचे बारीक लक्ष असते. प्रत्येक विभागाअंतर्गत असलेल्या वॉर रूममार्फत अशा रुग्णांची नियमित विचारपूस केली जात आहे. 
    - सुरेश काकाणी,  अतिरिक्त महापालिका आयुक्त
 

Web Title: coronavirus: Four lakh 91 thousand people are still home quarantined in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.