Join us

coronavirus: ही तर डोमकावळ्यांची फडफड, भाजपाला शिवसेनेचा सामनामधून टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 08:53 IST

महाराष्ट्र प्रकारशमान, तेजस्वी करण्यासाठी युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र डोमकावळ्याचे हे फडफडणे औटघटकेचे ठरेल, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

ठळक मुद्दे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. सारा देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देत असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. महाराष्ट्र राज्य हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपले वाटत असेल तर त्यांनी राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजेकोरोना योद्ध्यांवर अविश्वास दाखवून भाजपाला काय साध्य करायचे आहे, असा सवालही सामनाधील अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे

मुंबई - राज्यात कोरोनाचे संकट अधिकाधिक गहिरे होत असतानाचा महाराष्ट्र भाजपाने राज्यातील उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे, महाराष्ट्र बचाव आंदोलनांतर्गत भाजपाचे नेते आज कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील सरकारचा निषेध नोंदवणार आहेत. मात्र भाजपाच्या या आंदोलनावर शिवसेनेने घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्र प्रकारशमान, तेजस्वी करण्यासाठी युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र डोमकावळ्याचे हे फडफडणे औटघटकेचे ठरेल, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. पाटील-फडणवीसांनी भान राखून बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, मात्र विरोधकांत शहाणपण उरले आहे काय? असा सवालही सामनामधून उपस्थित करण्यात आलाय.सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. सारा देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देत असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. मेरा आंगण मेरा रणांगण अशा प्रकारचे या आंदोलनाचे बारसे झाले आहे. या आंदोलनासाठी काळे कपडे घालून सरकारचा निषेध करावा, असा फतवाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढला आहे. मात्र चंद्रकांत पाटील आणि भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचे केस साफ पांढरे होऊन त्यांची चांदी झाली आहे. आता ते डोक्याला कलप लावून अंगणातील रणांगणात उतरणार काय? कारण सर्वच काळे करा असा आदेश आहे.

जे केरळला जमले ते महाराष्ट्राला का जमले नाही, असे पाटील विचारतात. मात्र केरळ मॉडेलचा पाटील यांनी नीट अभ्यास केलेला दिसत नाही. केरळचे मुख्यमंत्री विजयन हे केंद्राच्या सूचना पाळत नाहीत. मोदींसोबतच्या बैठकीत सहभागी होणे म्हणजे वेळेचा अपव्यय असे ते मानतात. त्यामुळे पाटील व फडणवीस यांनी महाराष्ट्रापेक्षा केरळात जाऊन रणांगण गाजवावे. महाराष्ट्राचे अंगण स्वच्छ आहे आणि कोरोना योद्धे रणांगणात लढत आहेत, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. ही बाब भाजपा नेत्यांना मान्य नसेल तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे. महाराष्ट्र राज्य हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपले वाटत असेल तर त्यांनी राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे. तसेच राज्यपालांच्या अंगणात लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे का, की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. राज्यात आतापर्यंत दहा हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे कसले लक्षण आहे. कोरोना योद्ध्यांवर अविश्वास दाखवून भाजपाला काय साध्य करायचे आहे, असा सवालही सामनाधील अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. 

टॅग्स :शिवसेनाभाजपाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसचंद्रकांत पाटील