Join us  

coronavirus: इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या, देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:19 PM

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने इतर राज्यांतील सरकारांनी दिलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांना मदत द्यावी, अशी मागणी केली.

ठळक मुद्देसध्या उदभवलेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारांप्रमाणेच राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांसाठी पॅकेज जाहीर करावेअशाप्रकारचे पॅकेज जाहीर करण्यात न आलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे

मुंबई - राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा राज्य सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. दरम्यान, राज्य भाजपाने आज कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने इतर राज्यांतील सरकारांनी दिलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांना मदत द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या उदभवलेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. राज्य सरकारने शेतमालाच्या खरेदीची व्यवस्था केलेली नाही. शेतमाल खरेदीचे पैसे केंद्राकडून दिले जातात. मात्र हा माल खरेदी करण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे. तसेच राज्यातील बारा बलुतेदारांसमोर मोठे संकट निर्माण झालेले आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारांप्रमाणेच राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांसाठी पॅकेज जाहीर करावे. दरम्यान, अद्याप अशाप्रकारचे पॅकेज जाहीर करण्यात न आलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आर्थिक पॅकेजबाबत जसे केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सध्या राज्य सरकारने कातडी बचाओ धोरण अवलंबले जात आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या वेदना मांडल्या नाहीत तर जनतेला न्याय मिळणार नाही. जनतेच्या वेदना मांडण्यामध्ये कसले राजकारण आहे. सरकार जनतेसाठी काही करणार नाही आणि आम्ही गप्प बसावं, हे होणार नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची चौथ्या टप्प्यातील अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्यावर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात  अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस