Coronavirus : मेड इन मुंबई! अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने अवघ्या २५० रुपयांत तयार केले व्हेंटिलेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 05:18 PM2020-04-10T17:18:45+5:302020-05-12T19:39:56+5:30

त्रिलोक सावंत या अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याने २५० रुपयात हॅन्डी व्हेंटिलेटर तयार केला आहे.

Coronavirus : Engineering students make ventilators for just 250 rupees vrd | Coronavirus : मेड इन मुंबई! अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने अवघ्या २५० रुपयांत तयार केले व्हेंटिलेटर

Coronavirus : मेड इन मुंबई! अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने अवघ्या २५० रुपयांत तयार केले व्हेंटिलेटर

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर
मुंबई- मुंबईसह राज्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे हाय रिस्क कोरोनाबाधित रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी व अशा युद्धजन्य परिस्थितीत देशसेवा करता यावी यासाठी कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथील त्रिलोक सावंत या अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याने २५० रुपयात हॅन्डी व्हेंटिलेटर तयार केला आहे.

व्हेंटिलेटर मशिन बाहेर लाखोंच्या घरात आहे, ती मशीन आम्ही अवघ्या २५० रुपयांत बनवली आहे आणि ही मशीन तळहातात बसू शकेल एवढी आहे. मशीन ऑटोमॅटिक असल्यामुळे पेशंट स्वतः वापरू शकतो, त्यामुळे ही मशीन घरी पण वापरात येऊ अशी माहिती त्याने दिली. त्रिलोकने केवळ 250 रुपयांमध्ये "स्पंदन"लो कॉस्ट ऑटोमॅटिक पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार केल्याची माहिती मिळताच उत्तर मुंबई भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्या निवासस्थानी काल सकाळी भेट देऊन या व्हेंटिलेटरची सविस्तर माहिती घेतली. आपण या हुशार मराठी मुलाच्या व्हेंटिलेटर निर्मितीबद्दल प्रभावित झालो आहे. खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पोर्टेबल व्हेंटिलेटरबद्दल माहिती देणार असून, सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीत हा 250 रुपयांचा पोर्टेबल व्हेंटिलेटर देशाला खूप उपयुक्त असल्याचे सांगणार आहे, अशी माहिती खासदार शेट्टी यांनी लोकमतला दिली.

आपण आपल्याबरोबर डॉ. बिपीन दोशी आणि अनुभवी मेकॅनिकल इंजिनियर यांना घेऊन गेलो होतो. तेव्हा त्यांनी देखील सदर व्हेंटिलेटर देशाला सध्याच्या कोरोनजन्य स्थितीत खूप उपयोगी पडेल असे सांगितल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली. त्रिलोक हा बोरिवली पश्चिम येथील सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशनच्या शेवटच्या वर्षाला आहे. इयत्ता 8 वीपासून लहान वयातच कृतीशील प्रयोगनिर्मिती करण्याची त्याला आवड असून, आतापर्यंत त्याने 14 शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच 40 पेटंट त्याला मिळाले आहेत. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला राष्ट्रीय पारितोषिकेसुद्धा मिळाली आहेत.

 सध्या लॉकडाऊनमुळे सर्व दुकान बंद होती. त्यामुळे संशोधनसाठी आवश्यक सामग्री व तंत्रज्ञान पुरवण्यामध्ये आकाश साळुंखे, विभव सावंत, अभिषेक सलियान, एशली समकुट्टी यांचा मोलाचा वाटा आहे. ठाकूर व्हिलेज येथील मित्राच्या घरातील एका खोलीत एका रात्रीत सुमारे 8 तासात  मर्यादित सामानात हा पोर्टेबल व्हेंटिलेटर तयार करण्यात आल्याची माहिती त्याने लोकमतला दिली. व्हेंटिलेटर तयार करण्याची कल्पना कशी सुचली असे विचारले असता त्रिलोक सावंत म्हणाला की, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मर्यादित हॉस्पिटल व व्हेंटिलेटरमुळे त्यांच्या उपचारात बाधा येऊ शकते .जे व्हेंटिलेटर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते लाखांच्या घरात आहे  आणि तेच व्हेंटिलेटर भाड्याने घ्यायचा विचार केला तर एका दिवसाचं भाड ४००० ते १०००० एवढी आहे जे सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर आहे आणि सर्वात महत्त्वाचे कोरोना पेशंटचा  इतर पेशंटना त्रास होऊ शकतो. जे इतर पेशंट व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांची घरी सोय करता येत नाही. हे सर्व प्रश्न कसं सोडवू शकतो याचा विचार करताना सर्वसामान्य माणसाला परवडेल व कुठेही घेऊन जाऊ शकू, असं व्हेंटिलेटर बनवायचं ठरवलं. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे घरात व मित्रांकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून या आधुनिक व्हेंटिलेटरची निर्मिती केली.

स्पंदन" लो कॉस्ट ऑटोमॅटिक पोर्टेबल व्हेंटिलेटरची ठळक वैशिष्ट कोणती असे विचारले असता त्रिलोक म्हणाला की, एन -95 मास्कच्या किमतीत २५० रुपयात हा व्हेंटिलेटर तयार केला आहे. मशीन पूर्ण पणे ऑटोमॅटिक आहे कोणीही वापरू शकतो.आणि हे मशीन खूप छोटी आहे, अवघ्या तळ हातात मावते. आपण कुठे ही घेऊन जाऊ शकतो. मशीनला बॅटरीवर पण चालू शकते. या मशीनद्वारे नाकावाटे काही औषध फुफ्फुसापर्यंत पोहोचण्याची सोय आहे जी फक्त महागड्या व्हेंटिलेटरमध्येच असते. क्रिटिकल कंडिशनमध्ये रुग्णाला कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देण्याची सोय पण उपलब्ध होऊ शकते. एका तासाला फक्त १० पैसे एवढी ऊर्जा लागते. या मशीनची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मशीन रूग्णला स्वतःहून श्वास घेण्यासाठी व फुफ्फुसची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत करते जेणेकरून व्यक्ती लवकरात लवकर व्हेंटिलेटर शिवाय स्वतःहून उत्तमरीत्या श्वास घेऊ शकतो, अशी या पोर्टेबल व्हेंटिलेटरची ठळक वैशिष्ट्य असल्याची माहिती त्याने दिली.

व्हेंटिलेटर कसे चालते याबद्दल अधिक माहिती देताना त्याने सांगितले की, जेव्हा पेशंटला स्वतःहून श्वास घ्यायला त्रास होतो तेव्हा त्याला मशीनवर अवलंबून राहायला लागतं. जेणेकरून पेशंटची श्वासोच्छवास प्रक्रिया सुरू राहते ती मशीन म्हणजे व्हेंटिलेटर. ही मशीन गरजेनुसार प्राणवायू कृत्रिमरीत्या फुप्फुसांपर्यंत पुरवठा करते. आम्ही जी मशीन बनवली आहे ती टाईम सायकल बेस  सकारात्मक हवेचा दाब तयार करते, जेणेकरून फुप्फुसांपर्यंत  प्राणवायू  पुरवठा होऊ शकतो व कार्बन डायऑक्साईड बाहेर काढू शकतो. ही प्रक्रिया  पूर्णपणे ऑटोमॅटिक मायक्रो कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित केली जाते. कधी कधी पेशंटला नाकावाटे औषध द्यायची गरज भासते, तसेच क्रिटिकल कंडिशनमधील पेशंटला एक्सर्टनल ऑक्सिजन पुरवायला लागतं, या मशीनद्वारे आपणं दोन्ही काम करू शकतो. मर्यादित सामानामुळे सेन्सर जोडले गेले नाही जर जोडले तर या मशीनची कार्यक्षमता दुपटीने वाढेल व मशीन अजून एडवांस  होऊ शकते, जेणेकरून आपण पेशंटची  हेल्थ मॉनिटर करू शकतो. ही मशीन केवळ कृत्रिमरीत्या श्वास न पुरवता पेशंटला स्वतःहून पूर्वी सारखा श्वास घेण्यास मदत करते.

तुझा फ्युचर प्लॅन काय आहे, असे विचारले असता त्रिलोक म्हणाला की, या मशीन बनवायचं मूळ उद्देश कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचवणे हा आहे. या शोधाच प्रॉडक्टमध्ये रुपांतर केलं तर एक शस्त्र म्हणून कोरोनाच्या विरोधात लढण्यास मोठी मदत होऊ शकते. यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे गरजेचं आहे. त्यामुळे सरकारी व इतर संस्था, महिंद्रा,टाटा, रिलायन्स व इतर कंपनी जे कोरोना विरोधात लढताना मोलाच काम करत आहेत, त्यांना आम्ही निवेदन करतो की लवकरात लवकर हे व्हेंटिलेटर लोकांपर्यंत पोहोचवावे अशी प्रकट इच्छा त्याने शेवटी व्यक्त केली.

Web Title: Coronavirus : Engineering students make ventilators for just 250 rupees vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.