coronavirus: दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन द्या, दलित युथ पँथरची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 02:54 IST2020-05-13T02:54:23+5:302020-05-13T02:54:27+5:30
राज्यांमध्ये आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेले सरकारी दवाखाने, रुग्णालये यांची क्षमता लक्षात घेता ते पुरेसे नाहीत.

coronavirus: दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन द्या, दलित युथ पँथरची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : वस्त्यांमधील खासगी दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यात यावे. राज्य सरकारतर्फे त्यांना वैयक्तिक सुरक्षा संच उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी होऊन सरकारी रुग्णालयांवरील भार कमी होईल, अशी मागणी दलित युथ पँथरच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्यांमध्ये आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेले सरकारी दवाखाने, रुग्णालये यांची क्षमता लक्षात घेता ते पुरेसे नाहीत. राज्य सरकारतर्फे वांद्रे-कुर्ला संकुल, महालक्ष्मी रेसकोर्स, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी नवीन रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. विषाणूचा फैलाव लक्षात घेता खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णालयाची व्यवस्था लागणार आहे. या पार्श्वभूमीवर वस्त्यांमधील खासगी दवाखाने सुरू ठेवण्यासाठी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यात यावे. राज्यातील मध्यम व मोठी खासगी रुग्णालये तसेच नर्सिंग होम राज्य शासनाने ताब्यात घ्यावीत. यासाठी रुग्णालय व नर्सिंग होमच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून मोबदला देण्याबाबत निर्णय करावेत. यामुळे प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध होईल व चांगल्या गुणवत्तेने उपचार करणे शक्य होईल.
मुंबई आणि राज्यातील उपाहारगृहे सरकारने ताब्यात घ्यावीत. त्यांचा उपयोग कोरोनाग्रस्तांचे विलगीकरण करण्यासाठी करता येईल. काही उपाहारगृहांचे रुग्णालयात रूपांतर करणे शक्य होईल. बहुतांश मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे यामध्ये खर्चही कमी येईल. याबाबतही हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करून मोबदला देण्याबाबतचा निर्णय केला जाऊ शकतो.