Coronavirus : घाबरू नका पण सावध राहा,आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 22:17 IST2022-01-11T22:16:14+5:302022-01-11T22:17:00+5:30
Coronavirus In Mumbai: मागील आठवड्यात कोविड बाधित रुग्णांचा दररोजचा आकडा २० हजारांवर पोहोचला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्हिटीचा दर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आला आहे.

Coronavirus : घाबरू नका पण सावध राहा,आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन
मुंबई - मागील आठवड्यात कोविड बाधित रुग्णांचा दररोजचा आकडा २० हजारांवर पोहोचला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्हिटीचा दर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, पण सावधगिरी बाळगा असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना केले आहे.
मुंबईत २१ डिसेंबर २०२१ नंतर कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला आहे. या काळात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेल्याने संपूर्ण शहरात चिंतेचे वातावरण पसरले. मागील दोन आठवड्यांत दररोजच्या बाधित रुग्णांच्या संख्येत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा एक लाखांवर पोहोचला होता.
त्यानुसार रविवारपासून राज्य सरकारने मुंबईत अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. त्यांनतर मागील दोन दिवसांत रुग्ण संख्येत घट दिसून येत आहे. दररोजची रुग्ण संख्या २० हजार ७०० वरून ११ हजार ६४७ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णालयांत ८० टक्के खाटा रिकाम्या आहेत. मंगळवारी एका दिवसात ८६१ रुग्ण दाखल झाले तर ९६६ खाटा रिक्त झाल्या आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
२२ दिवसांत ४६ मृत्यू...
तिसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांची संख्या मोठी असली तरी मृतांचा आकडा नियंत्रणात आहे. मागील २२ दिवसांमध्ये ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच दररोज सरासरी दोन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणले आहे. तसेच मास्क वापरा आणि कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहनदेखील केले आहे.
रुग्ण संख्येत घट, याचे श्रेय सर्वांनाच...
मागील तीन दिवसांत रुग्ण संख्येतील घट हे सर्वांचे श्रेय आहे. यावरून मुंबईकर नियमांचे पालन करत आहेत हे दिसत असल्याचे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. निर्बधांचे पालन केले जात असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. हे पालिका प्रशासन आणि मुंबईकरांचे यश आहे, असे त्या म्हणाल्या.