Coronavirus : देशांतर्गत विमानसेवा मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 05:59 IST2020-03-24T02:00:26+5:302020-03-24T05:59:11+5:30
coronavirus : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ तासांमध्ये साधारण ९५० ते ९८० विमानांची वाहतूक होते.

Coronavirus : देशांतर्गत विमानसेवा मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद
मुंबई : कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचे निर्देश दिल्याने देशभरातील इतर विमानतळाप्रमाणे मुंबई विमानतळदेखील ठप्प होणार आहे. मंगळवारी रात्रीनंतर देशांतर्गत विमानसेवाही बंद होईल.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. या बंदीमधून केवळ मालवाहतूक करणाऱ्या विमानांना वगळण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत सर्व विमान कंपन्यांनी त्यांची विमाने आपापल्या नियोजित ठिकाणी उतरतील, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ तासांमध्ये साधारण ९५० ते ९८० विमानांची वाहतूक होते. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवेत गेल्या २०-२५ दिवसांत सुमारे ५५ ते ६० टक्के घट झाली. आता देशांतर्गत विमानसेवा बंद झाल्यानंतर विमानतळावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल.
देशांतर्गत विमान वाहतूक बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान प्रवासात सर्व विमानतळांवर कर्मचारी व प्रवाशांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात यावे, विमानात प्रवाशांची गर्दी टाळावी आणि दोन प्रवाशांमध्ये एक आसन रिक्त ठेवावे, असे निर्देश दिले.