Join us

Coronavirus: धक्कादायक! मुंबईत कोरोनाबाधित रुग्णासोबत डॉक्टरचे अश्लिल चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 10:22 IST

संबंधित रुग्णाने या घडलेला सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाला सांगितला.

मुंबई:  लॉकडाउननंतरही राज्यासह मुंबई शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे यंत्रणांवरील ताण वाढत असून विषाणूवरील नियंत्रणाचे आव्हान अधिक कठीण होत आहे. राज्यात रविवारी ६७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ५४८ वर पोहोचली आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानूसार, मुंबई सेंट्रलमधील एका नामांकित रुग्णालयातील डॉक्टरने कोरोनाबाधित रुग्णाशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ४४ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु रुग्णाची प्रकृती थोडी चिंताजनक असल्यामुळे रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मे रोजी सकाळी एक ३५ वर्षीय डॉक्टर त्याला तपासण्यासाठी अतिदक्षता विभागात आला. तपासत असताना त्याने रुग्णाच्या अंगाचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. याबाबत रुग्णाने हटकल्यानंतर शांत झोपून राहण्यास या डॉक्टरने सांगितले. शरीराच्या सर्व भागांचे चुंबन घेतल्यानंतर तो लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली, असा आरोप रुग्णाने केला आहे. या सर्व प्रकारानंतर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित रुग्णाने या घडलेला सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाला सांगितला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने शहानिशा केल्यानंतर या डॉक्टरविरुद्ध आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार करत गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णामुळे संबंधित डॉक्टरला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरला सध्या अटक केली नसून त्याला विलगीकरण सक्तीचे करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईडॉक्टरपोलिस