Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: हनुमानासारखं पर्वत आणायला घराबाहेर पडू नका, नागरिकांना 'दादा'स्टाईल आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 12:56 IST

उद्या बुधवार ८ एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि शब्द ए-बारात साजरी करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी घरात बसूनच हे दोन्ही कार्यक्रम साजरे करावेत, असे आवाहन पवार यांनी केलं

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केलंय.  हनुमान जयंती आणि शब्द ए-बारातसंदर्भात हिंदू आणि मुस्लीम समजातील नागरिकांना विशेषत: हे आवाहन करण्यात आलंय.  उद्या हनुमान जयंती आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये. लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी वनस्पतीसाठी पर्वत उचलून आणला होता. आज जनतेला वाचवण्यासाठी हनुमानासारखं पर्वत उचलण्याची गरज नाही. त्यामुळे उद्या घरीच थांबा आणि हनुमान जयंती साजरी करा, असे अजित पवार यांनी म्हटलंय. 

उद्या बुधवार ८ एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि शब्द ए-बारात साजरी करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी घरात बसूनच हे दोन्ही कार्यक्रम साजरे करावेत, असे आवाहन पवार यांनी केलं आहे. मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. देशाचे पंतप्रधान, राज्याच्या मुख्यमंत्रीपासून सर्वांचेच सध्या एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग पाळून नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडली पाहिजे. नागरिकांनी घराबाहेर न पडता, पुढील सूचना येईपर्यंत सर्वच सण, उत्सव, धार्मिक विधी, कार्यक्रम, पूजा-अर्चा घरातच साजरी करावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. 

जागतिक आरोग्य दिनाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देत, आरोग्य विभागाचे महत्व आणि जागतिक आरोग्य संघटनेचं महत्व सर्वांनाच लक्षात आलंय. सध्या जग कोरोनाच मुकाबला करत आहे, असेही पवार यांनी म्हटले. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरल्यास गंभीर गुन्हे दाखल करू, असा इशाराच पवार यांनी दिलाय.  

टॅग्स :अजित पवारकोरोना वायरस बातम्यामुंबईआरोग्य