Join us

Coronavirus : २१ दिवसांचा लॉक डाऊन; जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 22:23 IST

Coronavirus : जीवनावश्यक साहित्य खरेदी करतानाच एटीएम बाहेर देखील पैसे काढण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता पुढील २१ दिवस देश लॉकडाऊन करणार असल्याची घोषणा केली आणि पुढील २१ दिवस काही मिळणार नाही या भीतीने लोकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती.

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी रात्री ८.३० नंतर बाजारात गर्दी होऊ लागली. जेथे जेथे दुकाने सुरू आहेत. तेथे तेथे मुंबईकर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकर गर्दी करू लागले. अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर नागरिकांची दूध, किराणा घेण्यासाठी रांगा लागल्या. गोरेगाव नागरी निवारा येथे महानंदाचे दूध तसेच किराणा आणि मेडिकल दुकानांत लोक गर्दी करू लागले. आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या. कांदिवली येथील महावीर नगर आणि बोरिवली परिसरात देखील नागरिक जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले. कुर्ला, सायन, घाटकोपर येथील ज्या मोठ्या बाजारपेठेत दुकाने सुरू होती. तेथे सगळीकडे हीच परिस्थिती होती. विशेषतः मेडिकल आणि किराणा मालाच्या दुकानाबाहेर लोकांनी रांगा लावल्या होत्या. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी उसळली आहे. अत्यावश्यक वस्तू, पदार्थ खरेदीसाठी भायखळा, माझगाव परिसरात जमले होते. धारावी, माहीम, सांताक्रूझ, चेंबूर, साकीनाका, अंधेरी, मरोळ, पवई या इतर परिसरात गर्दी उसळली होती.

जीवनावश्यक साहित्य खरेदी करतानाच एटीएम बाहेर देखील पैसे काढण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते. अनेक एटीएम बाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. याच काळात मेडिकल दुकानात मास्क घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. दरम्यान, मोदी यांचे भाषण संपल्यावर काही काळाने जीवनावश्यक साहित्य लोकांना मिळेल; ते खरेदी करण्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन करण्यात आले तेव्हा कुठे काही काळानंतर गर्दी ओसरत असल्याचे चित्र होते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यानरेंद्र मोदीमुंबई