coronavirus: टाटा रुग्णालयातही वाढले कोविड-19 चे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 03:14 AM2021-04-02T03:14:00+5:302021-04-02T03:14:35+5:30

coronavirus in Mumbai : मागील वर्षी कर्करोग रुग्ण असलेल्या कोविडग्रस्तांवर उपचारांकरिता एनएससीआय जम्बो कोविड केंद्र आणि टाटा मेमोरिअल रुग्णाने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले होते.

coronavirus: covid-19 patients in Tata hospital | coronavirus: टाटा रुग्णालयातही वाढले कोविड-19 चे रुग्ण

coronavirus: टाटा रुग्णालयातही वाढले कोविड-19 चे रुग्ण

Next

- स्नेहा मोरे 
मुंबई :  मागील वर्षी कर्करोग रुग्ण असलेल्या कोविडग्रस्तांवर उपचारांकरिता एनएससीआय जम्बो कोविड केंद्र आणि टाटा मेमोरिअल रुग्णाने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. आता पुन्हा कोरोना संक्रमण वाढत असताना टाटा मेमोरिअल रुग्णालयाने खाटांच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या रुग्णालयात ८८ कर्करोगग्रस्त कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 

टाटा मेमोरिअल रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी बंद केलेल्या खाटा पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयात हाय रिस्क रुग्णांची चाचणी करणे, चोवीस तास कार्यरत असणारी फिव्हर ओपीडी, कोविड आणि नाॅन कोविड रुग्णांसाठी वेगवेगळे उपचार कक्षाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरापासून कर्करोग रुग्णांसाठी टाटा मेमोरिअलच्या वतीने परळ येथील मैदानातही फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे, या क्लिनिकमध्ये आजपर्यंत २ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यास परळच्या झेविअर्स येथील मैदानात विशेष लसीकरण केंद्रही सुरू केले आहे.  

टाटा मेमोरिअलचे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले, कोरोनाचा संसर्ग कर्करोग रुग्णांमध्येही वाढत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, रुग्णालयात दाखल असणाऱ्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कुणीही गंभीर अवस्थेत नाही. वाढत्या संसर्गाच्या दृष्टिकोनातून टाटा मेमोरिअलमध्ये खाटांच्या क्षमतेतही वाढ करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मागील वर्षाप्रमाणे टेलिमेडिसीनवर अधिकाधिक भर देण्याचा सल्ला रुग्णांना देण्यात आला आहे. त्यामुळे टेलिमेडिसीनविषयी आता रुग्णांमध्ये जागरूकता असल्याने या माध्यमातून उपचार केले जाणार आहेत. 

कोरोनाविषयक नियमांचे पालन महत्त्वाचे
वाढत्या संसर्गाचा परिणाम कर्करोग रुग्णांवर होताना दिसून येतोय. त्यामुळे टाटा मेमोरिअल रुग्णालयाकडून याविषयी अधिक खबरदारी घेतली जात आहे. त्यात इनहाऊस कोरोना चाचण्यांवरही भर दिला जात आहे. याखेरीज, कर्करोग रुग्णांना लस मिळावी यासाठी त्यांना योग्य तपासणीअंती मार्गदर्शनपर सल्ला देण्यात येत आहे. तसेच वाढत्या संसर्गाविरोधात लढा देण्यासाठी पुन्हा एकदा टाटा रुग्णालयातील यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे; परंतु ही स्थिती वाढत असली तरी सामान्यांनी वा कर्करोग रुग्णांनी मास्कचा वापरआणि अंतर राखण्यावर भर द्यावा.
- डॉ. श्रीपाद बाणावली, कर्करोगतज्ज्ञ

Web Title: coronavirus: covid-19 patients in Tata hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.