coronavirus: धारावीत वाढतोय कोरोनाचा संसर्ग, चाचणी व लसीकरण वेगाने करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 21:11 IST2021-03-16T21:10:29+5:302021-03-16T21:11:39+5:30
coronavirus in Dharavi : ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक १८ बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर मंगळवारी कोरोना बाधित २१ रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे.

coronavirus: धारावीत वाढतोय कोरोनाचा संसर्ग, चाचणी व लसीकरण वेगाने करणार
मुंबई - गेले सहा महिने कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवणाऱ्या धारावीत रुग्ण संख्या वाढू लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक १८ बाधित रुग्ण सापडले होते. त्यानंतर मंगळवारी कोरोना बाधित २१ रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त होत आहे. खबरदारीसाठी महापालिकेने धारावीतील सर्व रुग्णांची चाचणी सुरु केली आहे. तसेच लसीकरणही वेगाने केले जाणार आहे. (Coronavirus growing in Dharavi will be infected, tested and vaccinated rapidly)
गेल्या एप्रिल- मे महिन्यात धारावीत झपाट्याने सुरु असलेला कोरोनाचा संसर्ग महापालिकेसाठी मोठे आव्हान ठरले होते. मात्र तात्काळ चाचणी, त्वरित निदान, संशयितांचे विलगीकरण आणि बाधित रुग्णांवर उपचार असे सूत्र अवलंबिण्यात आले. त्यामुळे काही काळातच धारावीत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. धारावी पॅटर्नचे जगभरात कौतुक झाले. जुलै - ऑगस्ट २०२० मध्ये कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होऊन सहावेळा धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली.
मात्र धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर असतानाच पुन्हा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ८ मार्च रोजी १८ रुग्ण आढळल्यानंतर दररोज येथे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आता येथील सक्रिय रुग्णांची संख्या ११३ एवढी आहे. तर दादरमध्येही १८ आणि माहीममध्ये २४ नवीन रुग्ण आढळले आहेत. धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजना सुरु आहेत. तसेच लसीकरणही या ठिकाणी वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.
१६ मार्च रोजी स्थिती
परिसर....एकूण....सक्रिय....डिस्चार्ज...
दादर....५२९३....२०२.....४९२५
धारावी....४२७९....११३....३८५०
माहीम....५२१४....२७५....४७८५