Coronavirus : Corona second victim, 56-year-old man dead in maharashtra vrd | Coronavirus : राज्यात कोरोनाचा दुसरा बळी, 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Coronavirus : राज्यात कोरोनाचा दुसरा बळी, 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.19 मार्चला त्या व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. देशातील हा कोरोनानं दगावलेला पाचवा बळी आहे. राज्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्याही 74 झाली असून, दिवसभरात 10 रुग्णांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी राज्यात कोरोनाचे पुण्यात 2, मुंबईत 8, यवतमाळ व कल्याणमध्ये प्रत्येकी 1 असे 12 नवीन रुग्ण शनिवारी आढळले होते. त्यामुळ राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली होती. त्यानंतर आता आणखी नव्या 10 रुग्णांची नोंद झाली असून हा आकडा 74वर गेला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 74 झाली असून, मुंबई 27, पिंपरी चिंचवड 12, पुणे 15, नागपूर 4, यवतमाळ 3, कल्याण 3, नवी मुंबई 3, रायगड 1, ठाणे + उल्हासनगर 2, अहमदनगर 2, औरंगाबाद 1, रत्नागिरी 1, अशी रुग्णांची नोंद झाली आहे. 


मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राजधानी मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 19 इतकी आहे. तर पुण्यात 11, पिंपरी चिंचवडमध्ये 12, नागपूर, यवतमाळ, कल्याणमध्ये प्रत्येकी 4, नवी मुंबईत 3, अहमदनगरमध्ये 2 आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरीत कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जण गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातून परतले आहेत, तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी आहे. तसेच आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील 25 वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक 41 वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.

कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे, अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.       

Web Title: Coronavirus : Corona second victim, 56-year-old man dead in maharashtra vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.