coronavirus: कोरोना नियंत्रणात, मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:20 IST2020-10-31T02:28:45+5:302020-10-31T07:20:18+5:30
coronavirus In Mumbai News : कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रण आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांत शंभर दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे.

coronavirus: कोरोना नियंत्रणात, मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर
मुंबई : कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रण आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांत शंभर दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे. परळ विभागात तर ३६२ दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. आता केवळ सात विभागांमध्ये एक हजाराहून अधिक रुग्ण सक्रिय आहेत.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढू लागला. विशेषतः पश्चिम उपनगरात रुग्णसंख्या कमी कालावधीत दुप्पट होत होती. मात्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत १५ सप्टेंबरपासून पालिकेचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन प्रत्येक मुंबईकरांची तपासणी करू लागले. चाचणीचे प्रमाण वाढवणे, रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे, अशा उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार आता मुंबईत नियंत्रणात आला आहे.
सध्या १८ हजार ३६७ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी दहिसर, अंधेरी पश्चिम, मालाड, अंधेरी पूर्व, कांदिवली, भांडुप आणि मुलुंड या सात विभागांना सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.४४ टक्के एवढा आहे. परळपाठोपाठ डोंगरी, वरळी, कुलाबा या विभागांमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी दोनशे दिवसांहून अधिक आहे.
सर्वाधिक मृत्यू
विभाग मृत्यू
के पूर्व - अंधेरी ७३७
एस - भांडुप ६१६
जी उत्तर - दादर, धारावी ६०४
पी उत्तर - मालाड ५३६
एन - घाटकोपर ५२१
रुग्णवाढीचा सरासरी दरही दहा दिवसांत ०.२५ टक्क्यांनी कमी झालेला आहे. २० ऑक्टोबरला हा दर ०.६९ टक्के होता, तो आता ०.४४ टक्के एवढा खाली घसरला आहे.
२० ऑक्टोबर रोजी रुग्णदुपटीचा कालावधी शंभर दिवसांवर पोहोचला होता. त्यानंतर चारच दिवसांत म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी दुपटीचा कालावधी १२६ दिवस एवढा झाला. तर शुक्रवारी १५७ दिवसांपर्यंत पोहोचला आहे.