Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद; लांबपल्ल्याच्या गाड्याही रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:04 IST2020-03-26T03:18:31+5:302020-03-26T06:04:48+5:30
Coronavirus: मागील अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मंगळवारी, रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केले आहे.

Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद; लांबपल्ल्याच्या गाड्याही रद्द
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयाने मुंबईची उपनगरीय लोकल, देशातील लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, कोलकाता मेट्रो सेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी, पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी कोरोनामुळे २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केली. परिणामी, १४ एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मंगळवारी, रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केले आहे. परिणामी सामान्य प्रवाशांसाठी मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर एकही लोकल धावणार नसल्याचे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे.
लोकल, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधून होम क्वारंटाइनचे स्टॅम्प असलेले प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे इतर प्रवाशांच्या तक्रारीने या प्रवाशांना एक्स्प्रेसमधून उतरविण्यात आले. होम क्वारंटाइनचा स्टॅम्प असलेल्या प्रवाशांमुळे इतर प्रवाशांनाही याची लागण होण्याच्या भीतीने, देशभरातील रेल्वे सेवा २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केली होती. ही सेवा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा रेल्वे मंडळाने निर्णय घेतला होता. आता १४ एप्रिलपर्यंत एकही लोकल सेवा नसेल.