Join us  

Coronavirus: 'दुर्दैवाने कर्तव्यावरील पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५० लाखांची मदत'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 4:42 PM

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक स्तरावर आपलं काम चोखपणे बजावत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कामात हिरिरीने सहभाग घेतल्याचं दिसून येतंय

मुंबई - राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिली. राज्यात शुक्रवारी कोरोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगरचे, ११ पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २  रुग्ण औरंगाबादचे तर  प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक स्तरावर आपलं काम चोखपणे बजावत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कामात हिरिरीने सहभाग घेतल्याचं दिसून येतंय. तसेच, उपमुख्यमत्री अजित पवारही सातत्याने लोकांना कोरोनाच्या गांभीर्याची जाणीव करुन देताना दिसत आहेत. आज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ,आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत कर्तव्यावर असताना कोरोनामुळे एखाद्या पोलीस बांधवाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास ५० लाख रुपयांची सानुग्राह मदत करण्यात येईल.  तसेच,‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात होमगार्ज जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही, कोरोनाच्या लढाईत योगदान देणाऱ्या कर्चमाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. त्यानंतर, आज महाराष्ट्र सरकारनेही पोलीस कुटुंबीयांबाबत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :अजित पवारकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिसडॉक्टर