coronavirus : मुंबईला कोरोनाचा विळखा; दिवसभरात 522 नव्या रुग्णांचे निदान, एकूण बधितांची संख्या 4 हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 22:35 IST2020-04-23T22:35:00+5:302020-04-23T22:35:39+5:30
मुंबईतील विविध भागात कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे.

coronavirus : मुंबईला कोरोनाचा विळखा; दिवसभरात 522 नव्या रुग्णांचे निदान, एकूण बधितांची संख्या 4 हजारांवर
मुंबई - राज्यात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने मुंबईभोवतीचा आपला विळखा अधिकच घट्ट केला आहे. मुंबईत आज एका दिवसात 522 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे, त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात मुंबईत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा आकडा 167 वर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध भागात कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासात मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत 522 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईतील धरावी परिसरात आज कोरोनाचे 25 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 214 झाला आहे. तर धारावीत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यातही कोरोनाची स्थिती भीषण होतेय, लाॅकडाऊन असूनही राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. राज्यात गुरुवारी दिवसभरात ७७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, हे आतापर्यंतचे राज्यातील सर्वाधिक निदान आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनासमोरचे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान अधिक कठोर होत आहे. राज्यात गुरुवारी १४ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २८३ वर पोहोचला आहे.