CoronaVirus 52 new patients reported in mumbai country crosses toll of 3 thousand kkg | CoronaVirus: मुंबईत आज आढळले कोरोनाचे ५२ नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारांवर

CoronaVirus: मुंबईत आज आढळले कोरोनाचे ५२ नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारांवर

मुंबई: देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वेगानं वाढत आहे. आज एकट्या मुंबईत कोरोनाचे ५२ नवे रुग्ण आढळून आले. तर ९६ संभाव्य कोरोनाबाधित रुग्णालयांमध्ये दाखल झाले. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली. गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२५ नं वाढला आहे. एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ ठरली आहे. यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा ३ हजार ७२ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. मुंबईत शनिवारी ५२ रुग्णांचे निदान झाले असून आता एकूण रुग्णांची संख्या ३३० वर पोहोचली आहे. राज्यात ५०० च्यावर पोहोचलेल्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाटा मुंबई शहराचा आहे. आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीकोनातून ही शहरासाठी चिंताजनक बाब असून सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

मुंबईत पाॅझिटिव्ह निदान झालेल्या ५२ रुग्णांपैकी १४ रुग्णांच्या चाचण्या खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत करण्यात आल्या आहेत. याखेरीज, सर्व रुग्णांच्या सहवासितांना शोधून कार्यवाही करण्यात आली आहे. मुंबईत नवीन तीन मनपा विलगीकरण केंद्र आणि खासगी विलगीकऱण केंद्र सुरु करण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या ६० वर्षांखालील सर्व रुग्णांना सात विलगीकरण केंद्र आणि लक्षणे असलेया रुग्णांना पाच मनपा व अन्य खासगी विलगीकरण केंद्रांमध्ये उपचार करण्यात येतील. आजपर्यंत शहर उपनगरात पालिकेच्या विविध रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभागात तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या ९ हजार ३११ एवढी आहेत. तर एकूण २ हजार ४२६ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. शहर उपनगरात एकूण २२ मृत्यूंची नोंद झाली असून ३४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण
आजमितीस शहर उपनगरातील नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण व तपासणी कऱण्यात आली आहे. दाट वस्तीतील सर्व अति सहवासित नागरिकांना लाॅज आणि वसतिगृहांमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. मुंबईत सार्वजनिक व खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना (कोविड-१९) च्या एकूण १० हजार इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्या अन्य शहर वा राज्यांपेक्षा जास्त आहेत.

४ एप्रिलची आकडेवारी
बाह्यरुग्ण विभागात तपासणी केलेले रुग्ण १९९
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ९६
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण ५२
डिस्चार्ज केलेले रुग्ण १४

Web Title: CoronaVirus 52 new patients reported in mumbai country crosses toll of 3 thousand kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.