Join us  

कोरोनाचे मेडिक्लेम चार महिन्यांत पाच पटीने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 6:12 PM

Corona News : मे महिन्यांतील ८ टक्के क्लेम सप्टेंबर महिन्यांत ४० टक्क्यांवर

मुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात (एप्रिल ते सप्टेंबर) आरोग्य विमा कंपन्यांकडे ११ हजार ५०० कोटी रुपयांचे मेडिक्लेम दाखल झाले असून त्यात २९ टक्के वाटा हा कोरोना रुग्णांच्या क्लेमचा  आहे. विशेष बाब म्हणजे कोरोना रुग्णांच्या क्लेमची संख्या दिवसागणीक वाढत चालली आहे. मे महिन्यात ते एकूण क्लेमच्या ८ टक्के होते. सप्टेंबर महिन्यांत त्यांनी ४० टक्क्यांवर झेप घेतल्याची माहिती हाती आली आहे.

कोरोना देशात हातपाय पसरू लागल्यानंतर त्यावरील उपचार खर्चांनीसुध्दा अनेकांच्या मनात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण या कालावधीत २३ टक्क्यांनी वाढले आहे. विमा कंपन्यांनी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत आरोग्य विमा पाँलिसीच्या प्रिमियमपोटी २२,९०३ कोटी रुपये मिळाले आहेत. याच कालावधीत २ लाख ७ हजार कोरोना रुग्णांनी सुमारे ३३०० कोटी रुपयांच्या उपचार खर्चाचा परतावा मिळविण्यासाठी दावे दाखल केले आहेत. त्यापैकी १ लाख ३० हजार रुग्णांना १२६० कोटी रुपयांचा परतावा विमा कंपन्यांनी दिला असून उर्वरित दावे निर्णय प्रक्रियेत आहेत. विशेष म्हणजे या कालावधीत रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल झालेल्या देशातील रुग्णांची संख्या ३३ लाख ८७ हजार होती. मात्र, त्यापैकी ५.६१ टक्के रुग्णांकडेच खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांचे सुरक्षा कवच होते. जवळपास ५० ते ६० टक्के रुग्णांना सरकारी विमा योजनांचा किंवा सरकारी रुग्णालयांती विनामुल्य आरोग्य सेवेचा लाभ मिळाला असून उर्वरित रुग्णांना आपल्या खिशातून उपचार खर्च भागवावा लागल्याची माहिती हाती आली आहे.

विमा कंपन्यांकडे मे महिन्यांत जेवढे क्लेम  दाखल झाले होते त्यापैकी ८ टक्के क्लेम हे कोरोना रुग्णांचे होते. जून ते सप्टेंबर महिन्यांत त्यात अनुक्रमे १४ ,२३, ३४ आणि ४० टक्के अशी वाढ होत गेली. त्यामुळे सप्टेंबर अखेरीपर्यंतचे मेडिक्लेमचा टक्का २९ वर पोहचला आहे. आँक्टोबर महिन्यांत त्यात आणखी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.   

टॅग्स :आरोग्यकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक